

लोणावळा : वाहनांना काळ्या काचा, बिना नंबर प्लेटच्या दुचाकी चालवणे, कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर गाड्यांना बसवणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभे करणे, असे प्रकार करणार्या तब्बल १०५ जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी आज 18 जून रोजी कारवाई करत तब्बल एक लाख तीन हजार रुपयांचा दंड केला आहे. लोणावळा शहरचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
लोणावळा शहरामध्ये अनेक चारचाकी वाहने ही काळ्या काचा करून चालवली जातात, अनेक तरुण मुले गाड्यांच्या नंबर प्लेट काढून दुचाकी वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले होते, अशा वाहनांवर आज मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करत कर्णकर्कश आवाज करणारे व फटाके वाजवणारे सायलेन्सर असणाऱ्या दुचाकी गाड्यांचे सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले. तसेच नो पार्किंगमध्ये रस्त्यावर वाहने उभी करत रहदारीला अडथळा निर्माण करणारी वाहने अशा प्रकारच्या एकूण 105 वाहनांवर आज दिवसभरात ही कारवाई करण्यात आली.
लोणावळा शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक चमन शेख, पोलिस हवालदार अनिल शिंदे, पोलिस हवालदार सचिन कडाळे, पोलिस कॉन्स्टेबल फाळके, पोलिस कॉन्स्टेबल शेख, पोलिस कॉन्स्टेबल शितोळे, पोलिस कॉन्स्टेबल शिंदे, होमगार्ड व वॉर्डन यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट, नंबर प्लेट न लावता वाहने चालवणे अशा प्रकारच्या वाहनांवर या पुढील काळात देखील कडक कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक विभागाला दिल्या आहेत. नगरसेवक, आमदार, खासदार असे वेगवेगळे स्टिकर वाहनांवर लावून वाहने चालवणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- सचिन पाटील, पोलिस निरीक्षक, लोणावळा.