पिंपरी: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील ऑनलाइन सेवा देणारा सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने वाहनधारक, चालक आणि विविध कामांसाठी येणार्या नागरिकांची गैरसुविधा होत आहे.
शिकाऊ तसेच कायमस्वरूपी वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी, करभरणा, दंडाची रक्कम जमा करणे, मालकी हस्तांतरण तसेच इतर ऑनलाइन सेवांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने कार्यालयातील कामकाज संथ गतीने सुरू आहे.
दररोज शेकडो नागरिक वाहनविषयक कामांसाठी पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात येत असतात. मात्र, सर्व्हर सतत बंद पडत असल्याने ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
अनेकांना काम न झाल्याने पुन्हा कार्यालयात यावे लागत असून वेळ आणि आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. विशेषतः कामानिमित्त रजा घेऊन आलेल्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
सर्व्हरच्या समस्येमुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनाही कामकाज करताना समस्या निर्माण होत आहे. ऑनलाइन प्रणालीवर आधारित बहुतांश सेवा ठप्प झाल्याने अर्जांची प्रलंबित संख्या वाढत आहे. नागरिकांकडून वारंवार चौकशी होत असल्याने कर्मचार्यांनाही रोषाचा सामना करावा लागत आहे.