Pimpri Chinchwad Road Potholes Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Road Potholes: पावसात पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांची चाळण; खड्डे आणि पाणी साचल्याने नागरिक हैराण

दरवर्षी खड्डे बुजवूनही समस्या कायम; सिमेंट रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहतूक आणि नागरिकांना फटका

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम असून, खड्ड्यांमुळे होणार्‍या दुर्घटनांमुळे हे खड्डे बुजविणे आवश्यक झाले आहे. रस्त्यावरील मोठ्या खड्डयांमुळे अपघाताचीही भीती असते. त्यामुळे वाहने कासवगतीने चालवावी लागतात. हे खड्डे प्रत्येक पावसाळ्यात बुजविले जातात. मात्र, पावसामुळे खड्ड्यातील माती वाहून गेल्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन, देहू-आळंदी रस्ता, तळवडे, मोशी-चऱ्होली रस्ता, बोऱ्हाडेवाडी, काळभोरनगर, फिनोलेक्स ते मोरवाडी रस्त्यावर पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.

निगडी ते चिंचवड मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे रस्ते आधीच अरुंद झालेले आहेत. यामध्ये रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांनाही वाहने सावकाश चालावावी लागतात. त्यामुळे एसटी बस यासारखी वाहने वेळेवर थांब्यापर्यंत पोहचत नाही. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. हा खड्डा प्रत्येक पावसाळ्यात मुरूमने भरला जातो. एका पावसात ही सगळी माती वाहून जाते पुन्हा खड्डा तसाच राहतो. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात वाढत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.

पावसामुळे खड्ड्यात पाणी साचून राहते त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. येणार्‍या जाणार्‍या गाड्यांमुळे पादचारी लोकांची चालताना मोठी परवड होऊन बसते. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात वाढत आहेत.

सिमेंटच्या रस्त्यामुळे पाणी साचते

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बहुतांश ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र, पावसात या रस्त्यावर पाणी वाहून न जाता पाण्याचे तळे साचून राहते.

शहरातील डांबरी रस्ते ही संकल्पनाच संपत चालली आहे. महापालिकेने गेल्या काही वर्षात सिमेंटचे रस्ते करण्याचा सपाटा लावला आहे. डांबरी रस्त्यामध्ये जसे पाणी मुरते तसे सिमेंटच्या रस्त्यामध्ये मुरत नाही.

पूर्ण राज्यात पावसामुळे दाणादाण झाली आहे. गेली आठवडाभरापासून दररोज येणार्‍या पावसामुळे थोड्याच वेळात सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. सिमेंटच्या रस्त्यामुळे पाणी जिरण्यास जागा नसल्याने पाणी रस्त्यावरील सखल भागात तुंबते. जोराच्या पावसात काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे.

बर्‍याचदा पाऊस थांबूनही पाण्याचा निचरा होत नाही. सिमेंट रस्त्यामुळे जमिनीत पाणी न मुरल्याने लोकवस्तीमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसते. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यापूर्वी सलग दोन तीन दिवस मुसळधार पाऊस झाला, तर नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याच्या घटना घडत होत्या. आता मात्र, थोडा जरी जोरदार पाऊस झाला तरी रस्त्यावर तळे साचून राहते आणि दोन ते तीन दिवस पाणी मुरत नाही. त्यामुळे पाऊस गेला तरी नागरिकांना रस्त्यावर पाणी साचल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT