Development Work Pudhari
पिंपरी चिंचवड

Smart City Road Digging Controversy: पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते खोदाईवर प्रश्नचिन्ह; स्मार्ट सिटी प्रकल्पाला पावसाळ्यात विशेष परवानगी

आयुक्तांच्या आदेशाला छेद देत ३८ किमी खोदाईस मंजुरी; इतर प्रकल्पांना बंदी असताना निर्णयावर वाद निर्माण

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पावसाळ्यात शहरातील नागरिकांना खड्डे आणि चिखलाचा सामना करावा लागू नये, यासाठी दरवर्षी १५ मेनंतर शहरातील रस्ते व पदपथ खोदकाम बंद केले जाते. यावर्षीही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खोदकाम बंदचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाला त्यांच्याच मान्यतेने स्मार्ट सिटी कंपनीकडून केराची टोपली दाखवल्याचा प्रकार समोर आला. ऐन पावसाळ्यात भूमिगत फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी ठेकेदाराला रस्ते खोदकाम करण्यास विशेष परवानगी देण्यात आली आहे. यामुळे इतर संस्था, खासगी नेटवर्किग कंपन्या तसेच, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

महापालिकेचे स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, ड्रेनेज विभाग तसेच, एमएनजीएल, महावितरण आणि अनेक खासगी नेटवर्किंग कंपन्या विविध सेवावाहिन्या व केबल टाकण्यासाठी रस्ते खोदतात. त्यासाठी महापालिकेकडून शुल्क आकारून परवानगी दिली जाते. खोदाई आणि निकृष्ट दर्जाच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळे दरवर्षी शहरातील रस्त्यांची वाट लागते. शहरातील रस्ते सुस्थितीत राहवेत, यासाठी दरवर्षी मान्सूनपूर्व रस्ते खोदाई थांबवली जाते. यंदाही १५ मे ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सर्व बाह्य संस्था, महापालिकेचे सर्व विभागांकडील भूमिगत सेवावाहिन्यांसाठी प्रत्यक्ष रस्ते खोदाईचे काम बंद ठेवण्यात येऊन, खोदलेले रस्ते तातडीने पूर्ववत करण्ण्यात यावेत, असे आदेश आयुक्तांनी दिले होते. या नियमावर बोट ठेवून महापालिकेने इतर अनेक शासकीय विभाग व खासगी कंपन्यांचे खोदकामाची परवानगी नाकारली. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीच्या कामासाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे.

स्मार्ट सिटीकडून फायबर ऑप्टिकल केबल नेटवर्कचे काम रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला दिले आहे. या कामाचे अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. त्यातच ऐन पावसाळ्यात या ठेकेदार कंपनीला म्हणजेच १९ जून २०२६ ला ३८ किलोमीटर रस्ते खोदाईची विशेष परवानगी देण्यात आली आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे महाव्यवस्थापक मनोज सेठिया यांनी ही परवानगी दिली. सल्लागार, आयुक्तांच्या मान्यतेने काही अटी-शर्ती टाकून ही परवानगी दिली गेली. परंतु, यावरून रस्ते खोदाईबाबतचे प्रशासनावर दुटप्पीपणा आरोप होत आहे. इतर कंपन्यांना खोदकामासाठी परवानगी दिली जात नाही. असे असताना केवळ स्मार्ट सिटीच्या ठेका घेतलेल्या संबधित ठेकेदार कंपनीवर प्रशासनाने एवढी मेहेरबानी का दाखवली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ऐन पावसाळ्यात फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी रस्ते खोदकामाला परवानगी देणे हे पालिका आयुक्तांनी दिलेल्या त्यांच्याच आदेशाचे उल्लंघन आहे. तर, ही रस्ते खोदाई ऐन पावसाळ्यात शहरात रस्त्यांची दूरवस्था करण्यास कारणीभूत ठरणारी असल्याचाही आरोप होत आहेत.

पावसाळ्यापूर्वी काम का केले नाही ?

स्मार्ट सिटी कंपनीअंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे २५५ कोटी रुपये खर्चून ६०० किलोमीटर अंतराचे ऑप्टीकल फायबर केबलचे जाळे टाकण्यात आले. त्यावेळी शहरभर खोदकाम करण्यात आले होते. नंतर सन २०२२ मध्ये या ऑप्टीकल फायबर केबलच्या वापरासाठी रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलनुसार निविदा काढण्यात आली. ती वादात सापडल्याने चार वर्षांपासून या कामाचे भिजत घोंगडे आहे. नंतर स्मार्ट सिटीने रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला हे काम दिले. यातून दरवर्षी ३२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा दावा करण्यात आला. त्यासाठी कंपनीने आणखी ३८ किलोमीटर रस्ते खोदाई करून केबल टाकण्याची परवानगी मागितली. मात्र, रेलटेल कंपनीला या कामाचे आदेश देऊन बराच कलावधी झाला. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही केबल का टाकण्यात आली नाही, ऐन पावसाळ्यात रस्ते खोदकाम करून शहरातील रस्त्यांची वाट लावण्याचा हा प्रकार नाही का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

अटी, शर्तीसह परवानगी दिल्याचा दावा

स्मार्ट सिटी कंपनीअंतर्गंत आवश्यक फायबर केबल टाकण्यासाठी संबधित कंपनीला आयुक्तांच्या मान्यतेने ही परवानगी दिली आहे. त्यांना खोदकाम व केबल टाकताना सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. अटी व शर्तींसह परवानगी दिली आहे. काही महिने शासनाकडून स्थगिती आदेश असल्यामुळे हे काम करण्यास विलंब झाला, अवे स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक तसेच, महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT