पिंपरी: अन्न व पुरवठा विभागाच्या पिंपरी चिंचवड शहरातील अ आणि ज परिमंडळ क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्डधारकांना नियमानुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस 5 किलो धान्य न देता कमी दिले जात आहे. त्यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई करण्यात येत नाही. सर्वसामान्यांची या माध्यमातून लूट सुरू आहे. असे प्रकार करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करून, ते प्रकार तातडीने बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा छावा मराठा युवा महासंघाने दिला आहे.
या संदर्भात अ परिमंडळचे पुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर आणि ज परिमंडळचे प्रदीप डंगारे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे प्रमुख धनाजी येळकर पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष राजेश गुंड, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर, पुणे पूर्वचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.
धनाजी येळकर पाटील यांनी सांगितले, की ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने थंम्ब घेऊन धान्य दिले जाते. काही मोजके स्वस्त धान्य दुकानदार रेशनकार्डधारकांना थम्ब घेऊन ई पॉस प्रणालीद्वारा निघणारी पावती देतात. इतर दुकानदार ती पावती देत नाहीत. यामुळे कार्डधारकाला आपले धान्य कमी येऊनही त्यांना जाब विचारता येत नाही.
त्याची तक्रार करता येत नाही. कार्डधारकाने थंम्ब दिल्यानंतर ई-पॉस पावतीची मागणी करूनसुद्धा त्याला पावती न देता त्याचे रेशन बंद करण्याची धमकी दिली जाते. नियमापेक्षा धान्य कमी देणाऱ्या दुकानदारावर कारवाई होत नाही. संबंधित अधिकाऱ्यांचीसुद्धा याला मूक संमती असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला आहे.
छावा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक दुकानावर जाऊन रेशन कार्डधारकांशी संवाद साधून जनजागृती अभियान सोमवारपासून (दि. 8) सर्व रेशन दुकानावर राबवण्यात येणार आहे. ज्यामुळे गरीब व गरजू कुटुंब आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहणार नाहीत.