Air Pollution Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Pollution: पवना, इंद्रायणी, मुळा ‘गटारगंगा’; पिंपरी-चिंचवडमध्ये जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणाचा कहर

शहरातील नद्यांमध्ये सांडपाणी, हवेत धुळीचे कण अन् १०० डेसिबलपर्यंत कर्णकर्कश आवाज; प्रदूषण रोखण्यासाठी ठोस धोरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या अतिप्रदूषित होऊन गटारगंगा झाल्या असून, त्या धोकादायक पातळीवर पोहचल्या आहेत. तसेच, बांधकाम प्रकल्प, आरएमसी प्लांट, उद्योग, रस्ते खोदकाम, भंगार गोदाम, वाहनांची बेसुमार संख्या आणि इतर कारणांमुळे शहरात वायू आणि ध्वनी प्रदूषणाने नागरिक बेजार झाले आहेत. त्याबाबत दिर्घकालीन कठोर उपाययोजना करण्याकडे महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या सद्य:स्थिती अहवालावरून समोर आले आहे.

शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. शहरात एकूण 91.50 किलोमीटर अंतराचे लहान व मोठे असे 143 नाले आहेत. एमआयडीसी परिसरातील कंपन्या तसेच, लघुउद्योगांचे रासायनिक सांडपाणी तसेच, घरगुती मैलासांडपाणी थेट नाल्याद्वारे नदीत मिसळत आहे. संपूर्ण शहरात महापालिकेकडून मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) अद्यापही उभारण्यात आलेले नाहीत. काही एसटीपी बंद स्थिती असल्याने थेट नदीत ते सांडपाणी नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीचे पाणी अतिदूषित झाले असून, दुर्गंधी येत आहे. नदी पात्रात बांधकाम राडारोडा टाकून भराव करण्याचे प्रकार दिवसाढवळ्या सुरू असून, ते थांबण्यास महापालिकेस अपयश आले आहे.

विविध कारणांमुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता ढासळली असल्याचा दावा पर्यावरण तज्ज्ञांकडून केला जात आहे. मात्र, पर्यावरण अहवालात नदीतील पाण्यातील ऑक्सिजनची पातळी 7.1 ते 7.9 अशी मर्यादित असल्याचा दावा करण्यात आला आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील नैसर्गिक नाल्यांवर तब्बल 365 ठिकाणी अतिक्रमण तसेच, ते बुजवल्याचे प्रकार समोर आला आहे. नाले अतिक्रमणमुक्त करण्याबाबत वारंवार घोषणा केल्या जात आहेत. प्रत्यक्ष कृती होताना दिसत नाही.

उन्हाळा, हिवाळ्यात शहराची हवा दूषित

शहरात अनेक भागांत गृहप्रकल्पासाठी इमारतींचे बांधकाम सुरू आहेत. चाळीस मजली इमारत निर्माण होत आहेत. त्यासाठी रेडीमिक्स प्लांट सुरू असल्याने तसेच, तेथील तसेच, रस्ते खोदकामांमुळे शहरात धुळीचे प्रदूषण वाढत आहे. कर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषणात भर पडत आहे. तसेच, सकाळी सात ते रात्री दहा वेळेत बांधकामांना बंदी असतानाही कामे केली जात आहेत. त्यासंदर्भात तक्रारी करूनही महापालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आवश्यक ती खबदारी घेतली जात नसल्याने बांधकाम प्रकल्पातील अजवड वाहनांमुळे रस्त्यांवर चिखल, माती, दगड, खड्डी पडून रस्ते खराब होत आहेत. भंंगार साहित्य जाणण्याचे प्रकार कमी होत नाहीत. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वायू व ध्वनी प्रदूषणात मोठी भर वाढत आहे. उन्हाळा आणि हिवाळ्यात शहराचे हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 190 पर्यंत पोहचतो. त्यामुळे फुफ्फस, हदयविकार, मुले व वृद्धांचा श्वास घेण्यास त्रास होतो, असे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

ठोस धोरण बनवण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

महापालिका प्रदूषण रोखण्याबाबत गंभीर नसल्याने ठोस धोरण तयार केले जात नाही. छोट्या-मोठ्या घटकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. स्मार्ट ट्रॉफीक प्रणालीची आवश्यकता असताना, आवश्यक नसलेल्या अर्बन स्ट्रीटची कामे केली जात आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. मोठी कामे केल्यानंतर त्यांच्या देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यानंतर निधी नसल्याचे कारण दिले जाते. महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, राष्ट्रीय हरित लवाद, पर्यावरण आदी विभागांची एक समिती बनवून प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. शहरापासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असून, त्यांनी कठोर भूमिका घेऊन नियम बनवण्यास शहरातील प्रदूषणाला बर्‍यापैकी आळा बसेल, असे पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरमचे तुषार शिंदे यांनी सांगितले.

ध्वनिप्रदूषणामुळे बालकांसह वृद्ध त्रस्त

शहरात बेसुमारपणे सुरू असलेले बांधकाम प्रकल्प, रस्ते खोदकाम, नवीन प्रकल्प, मेट्रो आदी कामामुळे शहरात ध्वनी प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले आहे. वाहनांच्या संख्येत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर संपूर्ण देशात दुसर्‍या क्रमांकावर जाऊन पोहचले आहे. वाहनांमुळे ध्वनिप्रदूषणात वाढतच चालले आहे. तसेच, शहरात गणेशोत्स व दिवाळी सणात सर्वांधिक ध्वनी प्रदूषण होत असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. तब्बल १०० डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद झाली आहे. त्यामुळे बालकांसह, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत.

कारंजे बंद स्थितीत

ड्राय मिस्ट बेस्ड सिस्टीम म्हणजेच पाण्याचे तुषार उडणारे यंत्रणा (कारंजे) शहरातील २३ ठिकाणच्या चौकात बसवण्यात आली आहे. त्याद्वारे धूलिकण जड होऊन जमिनीवर बसतात, असा दावा महापालिकेने केला होता. त्यातील अनेक यंत्रणा सध्या बंद स्थितीत आहेत. तसेच, स्टेशनरी फॉग कॅनन ही पाच वाहने शहरात नेमण्यात आली होती. त्याद्वारे रस्त्यावरील हवेतील धूळ नियंत्रित होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, ती वाहने नियमितपणे रस्त्यावर फिरत नसल्याचे चित्र आहे. तसेच, १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीचे रस्ते धुण्यासाठी ट्रॅक मॉन्टेड फॉग कॅनन ही पाच वाहने धूळ कमी करण्यासाठी नेमण्यात आली आहेत. तसेच, रोड वॉशरच्या दोन वाहने रस्ते सफाईसाठी नेमले आहेत. मात्र, ती वाहने रस्त्यांवरून गायब झाल्याचे अनेक रस्ते तसेच, झाडे चिखल व मातीने व्यापलेले दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT