पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेला यंदा पारदर्शकतेची जोड देण्यात आली आहे. सेटिंग आणि शिफारशींना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती मिळविण्यास इच्छुक असलेल्या अंमलदारांच्या गुरुवारी (दि. २५) दिवसभर मुलाखती घेण्यात आल्या.
प्रत्येक उमेदवाराचा सर्व्हिस शिट समोर ठेवून अनुभव, कायद्याचे ज्ञान, कामगिरी आणि संबंधित शाखेत काम करण्याची क्षमता तपासण्यात आली.
३०० अंमलदारांच्या घेतल्या मुलाखती
पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, रोहिदास पवार आणि गणेश इंगळे यांनी मुलाखती घेतल्या. अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांनी संपूर्ण प्रक्रियेवर स्वतः लक्ष ठेवत अनेक अंमलदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. कायद्यावरील आकलन, अनुभव आणि कामाची तयारी याची त्यांनी पडताळणी केली.
त्यामुळे केवळ शिफारस किंवा ओळखीच्या जोरावर इच्छित शाखेत पोस्टिंग मिळविणे कठीण झाल्याची चर्चा पोलिस दलात होती. गुन्हे शाखेसाठी १३३, विशेष शाखेसाठी १२२ आणि सायबर पोलिस ठाण्यासाठी ४५ अशा एकूण ३०० अंमलदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सकाळपासून सुरू झालेली प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
आधी शहर ओळखा..
नुकतेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बदली होऊन आलेल्या काही अंमलदारांनीही संवेदनशील शाखांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, शहराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कार्यक्षेत्राची पुरेशी माहिती नसल्याचे लक्षात आल्यानंतर, आधी शहराची माहिती घ्या, स्थानिक परिस्थिती समजून घ्या. त्यानंतर गुन्हे शाखेत काम करण्याची तयारी ठेवा, असा सल्ला देत त्यांनाही नकार देण्यात आला.
सर्व्हिस रेकॉर्डमुळे दिशाभूल अशक्य
यंदाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा बदल म्हणजे प्रत्येक उमेदवाराचा संपूर्ण सर्व्हिस शिट मुलाखत समितीसमोर उपलब्ध होता. संबंधित अंमलदाराची पूर्वीची नियुक्ती, कामगिरी, शिक्षा, पुरस्कार, गोपनीय अहवाल, तपासाचा अनुभव आणि शिस्तभंगाची माहिती समोर असल्याने चुकीची किंवा अतिशयोक्ती माहिती देऊन समितीची दिशाभूल करणे शक्य झाले नाही.
बीएनएसच्या कलमावर उमेदवार अडखळला
मुलाखतीदरम्यान एका अंमलदाराने गुन्हे शाखेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आपण दप्तरी काम पाहिल्याचे त्याने सांगितले. त्यावर अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील एका कलमाची व्याख्या विचारली. मात्र, त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यावर, आधी काम शिका, कायद्याचा अभ्यास करा आणि त्यानंतर गुन्हे शाखेत येण्याचा विचार करा, असे सांगत त्याला नकार दिला.
गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि सायबर पोलिस ठाण्यांमध्ये नियुक्ती करताना संबंधित कर्मचाऱ्यांचे कायद्याचे ज्ञान, तपासाचा अनुभव, तांत्रिक क्षमता आणि सेवा अभिलेख यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी मुलाखत प्रक्रिया राबविण्यात आली. गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारे सक्षम मनुष्यबळाची निवड करून बदल्यांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.- सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड