पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 13 वर्षांपूर्वी सुरू केलेली खेळाडू दत्तक योजना सात वर्षांपासून बंद आहे. ही योजना सुरू करण्याची वारंवार मागणी होऊनही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे खेळाडूंकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या योजनेसाठी गेल्यावर्षी अर्ज मागविल्यानंतर यंदाही खेळाडूकडून पुन्हा अर्ज मागविण्यात आले आहेत. क्रीडा विभाग लाभ देण्याऐवजी केवळ अर्जाचा घाट घालत असल्याची टीका खेळाडू तसेच, प्रशिक्षक व मार्गदर्शकांकडून केली जात आहे. (Latest Pimpri News)
खेळाडू दत्तक योजनेसाठी खेळाडूंची निवड आणि लाभ देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यात अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, शिक्षणाधिकारी, संबंधित खेळांचे अर्जून किंवा शिवछत्रपती पुरस्कारार्थी, माजी राष्ट्रीय खेळाडू आणि क्रीडा अधिकार्यांचा समावेश आहे.
शहरात किमान 3 वर्षे रहिवासी असलेल्या खेळाडूंसाठी ही योजना आहे. महापालिका शाळा, खासगी शालेय विद्यार्थी आणि अन्य खेळाडूंना या योजनेचा लाभ दिला जातो. अॅथलेटिक्स, हॉकी, कबड्डी, कुस्ती, मुष्टियुद्ध, नेमबाजी, खो-खो, लॉन टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, रोलर स्केटिंग आणि क्रिकेट या खेळात शालेय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतून राष्ट्रीय शालेय, महाविद्यालयीन आणि इतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना अर्ज करता येतो.
खेळांडूसोबत भेदभाव
महापालिकेने खेळाडू दत्तक योजनेसाठी गेल्या वर्षी अर्ज मागविले. त्यास राज्यस्तरीय खेळाडूंसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळलेल्या शहरातील खेळाडूंनी प्रतिसाद दिला. मात्र, क्रीडा विभागातील काही कर्मचार्यांनी खेळाडूंमध्ये भेदभाव करणे, वरिष्ठ अधिकार्यांना चुकीचा अहवाल सादर करणे, अधिकार्यांकडून अहवालाची शहानिशा न करता कार्यवाही होणे, पात्र खेळाडूंना लाभापासून वंचित ठेवणे आदी आरोप होत आहेत.
खेळाडूंमध्ये नाराजी
ती योजना सात वर्षांपासून बंद असल्याने होतकरू, गुणी आणि गरजू खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. खेळाच्या मैदानावर जिंकूनही महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या गलथान कारभारामुळे खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे. दरवर्षी अर्ज मागवतात. मात्र, दत्तक योजना निवड समितीपर्यंत ते पाठवत नसल्याने निर्णय होत नाही. त्यामुळे खेळाडूंना आशेला लावून पदरी निराशा पडत आहे.
दरमहा 6 हजार रुपयांचा लाभ
निवड झालेल्या खेळाडूंना पीएमपीचा बसचा मोफत प्रवास पास, सकस आहार, दूध किंवा ठराविक आहारभत्ता आणि मागणीनुसार खेळाचे साहित्य, गणवेश देण्यात येतात. लाभार्थींनी राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग किंवा प्रावीण्य मिळविल्यास त्यांना स्वतंत्र अर्जाव्दारे क्रीडा शिष्यवृत्ती किंवा आर्थिक सहाय्य देण्यात येते. पात्र खेळाडूंना फिजिओथेरपी, मानसोपचार आणि क्रीडा वैद्यक आदी सुविधा देण्यात येतात. खेळाडू दत्तक योजनेत दरमहा 6 हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
गेल्या वर्षीच्या खेळाडूंना लाभ नाही
गेल्यावर्षी क्रीडा विभागाने खेळाडू दत्तक योजनेसाठी अर्ज मागविले होते. त्यासाठी एकूण 47 खेळाडूंनी अर्ज केले. अर्ज करून एक वर्ष होऊनही खेळाडूंना लाभ दिला नाही. क्रीडा विभागाचे अधिकारी खेळाडूंना आशेला लावून कागदी घोडे नाचवत आहेत. लाभ मिळावा, यासाठी शहरातील खेळाडू व विविध क्रीडा संघटनांनी पत्रव्यवहार केला. क्रीडा धोरण समितीच्या बैठकांतही हा विषय मांडण्यात आला. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. महापालिका प्रशासनाच्या कारभारावर खेळाडूंमधून प्रचंड नाराजी आहे.