पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागाकडून प्लास्टिक वापर आणि अस्वच्छतेविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत नागरिक व व्यावसायिकांकडून एकूण 31 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
इंद्रायणी नगर येथे प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत देऊन 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. याच ठिकाणी आरोग्य विघातक कृत्ये, कचरा टाकणे व प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करत आणखी 8 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईत 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तीन किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. आरोग्य सहाय्यक गीता रिल व जगदीश चिंचोलीकर यांच्या पथकाने कारवाई केली.
शहरात प्लास्टिक वापर आणि अस्वच्छतेविरोधात महापालिका सातत्याने कठोर कारवाई करत आहे. पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्लास्टिकमुक्त शहराची संकल्पना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करून, ओला व सुका कचरा वेगळा करणे, तसेच प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत शहर घडविण्यासाठी सहकार्य करावे, असे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.