

मिलिंद कांबळे
पिंपरी : महापालिकेत नोकरी मिळावी म्हणून अनेकांचे स्वप्न असते. चांगल्या नोकरीतून जीवनातील अनेक गोष्टी साध्य होतील, या भावनेतून अनेकजण पालिकेत नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. असे सावज हेरून त्यांचा गैरफायदा घेत शहरातील काही टोळ्या तसेच, एजंट मंडळी बेरोजगार तरुण व त्यांच्या पालकांना गंडा घालत महापालिकेत नोकरी लागल्याचे बोगस नियुक्तीपत्र विकत आहेत. त्या प्रकारात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच, त्यांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. ही बाब गंभीर असतानाही त्याबाबत महापालिका प्रशासनाची चुप्पी अनेक प्रश्न व शंका उपस्थित करत आहे.
महापालिकेत अग्निशमन विभागाचे फायरमन तसेच, आरोग्य, उद्यान, स्थापत्य, वैद्यकीय
विभाग तसेच, लिपिक पदाची भरती गेल्या दोन ते तीन वर्षांत झाली. आवश्यकतेनुसार महापालिकेकडून कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया राबविण्यात येते. त्याचा गैरफायदा घेऊन बोगस नियुक्तीपत्र विक्रीचे प्रकार शहरात घडत आहेत.
सध्या महापालिकेत कोणत्याही पदासाठी नोकर भरतीप्रक्रिया सुरू नाही. एका टोळक्याने महापालिकेच्या नावाने बनावट लेटरहेड व शिक्के तयार केले आहेत. त्या लेटरहेडवर शिक्के मारून तसेच, आयुक्त तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी करून नियुक्तीपत्रे वाटली आहेत. या पत्रांमध्ये उमेदवारांची एका पदावर निवड झाल्याचे नमूद करून नियुक्तीची तारीखही दिली जाते. पत्रावर वेतन व इतर भत्ते यांचीही माहिती दिले जाते. तीन महिने चाचणी कालावधी असल्याचे सांगण्यात येते. रुजू होताना शैक्षणिक दाखले, ओळखपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागतील. नियुक्ती कायमस्वरुपाची असून, महापालिकेच्या सेवा नियमावलीच्या अधीन असेल, असे नियम दिले जातात. नियुक्तीपत्रासोबत रुजू होण्याची तारीख व विभागाचे नावही देण्यात येते. त्यामुळे नियुक्तीपत्राबाबत शंका येत नाही. पत्राची भाषाही सरकारी असते.
बेरोजगार तरुण तसेच, त्यांच्या कुटुंबीयांकडून लाखो रुपये घेऊन असे प्रकार करणारी शहरात काही टोळ्या कार्यरत असल्याची चर्चा आहे. वाढती बेरोजगारी तसेच, सरकारी नोकरीची ओढ लक्षात घेता ती टोळी बेरोजगार तरुणांना हेरत आहेत. त्यात अडकलेल्या तरुणांची मोठी आर्थिक फसवणूक होत आहे. असे प्रकार वाढतच आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून त्याबाबत ठोस कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. केवळ प्रसिद्धीपत्रक काढून तसेच, पोलिसात तक्रार अर्ज देऊन प्रशासन जबाबदारी झटकत आहे. प्रशासनाच्या या चुप्पीमुळे शंका उपस्थित केली जात आहे.
त्या टोळीत महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. तसेच, त्यांचे नातेवाईकही यात गुंतले आहेत. त्याप्रकरणी पोलिसांनी महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाला अटक केली आहे. त्यामुळे ही शंका खरी ठरत आहे. पालिकेचे लेटरहेड, शिक्के व सह्या पालिकेत कार्यरत असलेला कर्मचारीच पुरवू शकतात. त्या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिकेत शिपाई पदाची नोकरी देतो म्हणून मोठी रक्कम घेतली. त्याला बनावट नियुक्तीपत्र दिल्याचा गुन्हा संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात 5 मार्चला नोंदवला गेला आहे. त्यात वैष्णव कालिदास शेळके (27) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो प्रकार 9 जानेवारी ते 20 फेब्रुवारीदरम्यान घडला आहे. शहरात अनेक प्रकार घडलेले असताना आतापर्यंत केवळ एकच गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यात बेरोजगारी वाढते आहे. सरकारी नोकरीची ओढ सर्वांनाच असते. त्यात श्रीमंत नावलौकीक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नोकरीची अनेकांना भुरळ पडते. त्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये घेऊन नोकरीसाठी बोली लावली जाते. ती रक्कम देण्यास अनेक जण सहज तयार होतात. मात्र, महापालिकेत जेव्हा नियुक्तीपत्र घेऊन संबंधित विभागात संबंधित तरुण पोहचतात, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यानंतर संबंधित व्यक्तीही संपर्क क्षेत्राच्या बाहेर पडतो.
महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेत गृहप्रकल्प राबवले आहेत. त्या सदनिका देतो म्हणून अनेकांची फसवणूक करण्यात आली होती. 10 ते 25 हजार रुपये घेऊन अनेकांना महापालिकेचे बोगस लेटरहेडवर लाभार्थी असल्याचे पत्रही वाटण्यात आले होते. तसेच, महापालिकेची लाभार्थी व सदनिका क्रमाकांची यादीही दिली गेली होती. त्याबाबत महापालिकेने कोणतेच पाऊल उचलले नव्हते. तसेच, ठेकेदारांनी बँक ठेवीचे बनावट प्रमाणपत्र महापालिकेस सादर केल्याचा प्रकार मागे उघड झाला होता.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बोगस लेटरहेड बनवले जाते. तसेच, संबंधित विभागांचे बनावट शिक्के बनवले जातात. महापालिका आयुक्त तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्यांचे शिक्के बनवले जातात. अशा प्रकारे महापालिकेच्या शासकीय कागदपत्रांचे बनावट दस्तावेज तयार केले जातात. त्यातून अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक होत आहे. तरीही महापालिका प्रशासनाकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकर भरती असेल तर त्याबाबतची माहिती महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाते. उमेदवारांची निवड ही पारदर्शक पद्धतीने केली जाते. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे रोख व्यवहार किंवा मध्यस्थांमार्फत पैसे घेतले जात नाहीत. बोगस नियुक्तीपत्र देऊन आर्थिक फसवणुकीपासून नागरिकांनी सावध रहावे. त्यासंदर्भात महापालिकेने पोलिसांत तक्रार केली आहे. महापालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.