मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात लोकवस्ती वाढत असल्याने लोकसंख्या वेगात वाढत आहे. परिणामी, शहरात पाण्याची मागणी वाढत आहे. शहरासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यासाठी सत्ताधारी व प्रशासन शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. असे असताना या प्रकल्पाचा निधी इतर कामांना वळवला जात असल्याचे चित्र आहे. निधी पळवापळवीच्या या प्रकारामुळे पवना जलवाहिनीचा प्रकल्पाबाबत सत्ताधारी गंभीर आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आंद्रा पाणी योजनेसाठी 40 कोटी रुपयांचा निधी वळवला
पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचे काम गेल्या 15 वर्षांपासून ठप्प आहे. हा सुमारे 400 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प तब्बल 1 हजार 200 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. त्याचा सुधारित डीपीआर महापालिकेने तयार केला आहे. एकूण 35 किलोमीटर लांबीची भूमिगत समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करणे बाकी आहे.
या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराला 750 एमएलडी शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. त्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक बैठक झाली आहे. दुसरी बैठकही लवकर होणार आहे.
मावळ तालुक्यातील शेतकर्यांना विश्वासात घेऊन सर्वसहमतीने हा प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रशासनासह सत्ताधार्यांचे नियोजन आहे. या प्रकल्पास राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर अर्बन चॅलेज फंडातून कर्ज काढण्याची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. असे असतानाया प्रकल्पासाठी राखीव असलेला निधी इतर कामांसाठी वगळला जात असल्याचे दिसत आहे.
सध्या पवना धरणातून दररोज 550 आणि आंद्रा धरणात 100 एमएलडी पाणी घेतले जाते. तर, भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनीचे तसेच, जॅकवेलचे काम सुरू आहे.
महापालिकेची पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी धरणातून थेट भूमिगत जलवाहिनीद्वारे पाणी उचलणे, जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, नवीन पाण्याच्या टाक्या बांधणे, पाण्याची गळती कमी करणे, वितरण व्यवस्था बळकट करून शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी चालू असलेल्या कामांसाठी तसेच, आंद्रा पाणी योजनेच्या भूमिगत जलवाहिनीचे कामासाठी पवना बंद जलवाहिनीचा 40 कोटी रुपयांचा निधी त्या कामासाठी वळवण्यात आला आहे.
पाणीपुरवठा विशेष निधी या फंडातील पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी उपलब्ध 40 कोटी रुपयांची घट केली आहे. तो निधी वरील कामांसाठी वर्ग केला आहे. त्याला सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत सत्ताधारी भाजप गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष राखीव निधीतून काम करता येईल
पवना जलवाहिनीचे काम प्रत्यक्ष कधी सुरू होणार हे माहीत नाही. त्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व तयारी करून ठेवली आहे. शासनाच्या अर्बन चँलेज फंडातून त्यासाठी कर्ज घेतले जाणार आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. प्रकल्पासाठी सर्व 1 हजार 200 कोटींची रक्कम एकाच वेळी लागणार नाही. विशेष राखीव निधीतून 550 कोटी रुपयांत सुरुवातीचे काम करता येऊ शकते, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
निधीवरून भाजपमध्येच वाद ?
सर्वसाधारण सभेत पवना जलवाहिनी प्रकल्पाचा निधी वळवण्यास भाजपचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी विरोध दर्शविला आहे. शहरासाठी हा प्रकल्प अत्यावश्यक असताना त्या कामाची तरतूद इतर कामांना वळवू नये, अशी सूचना त्यांनी केली. त्यावर सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आक्षेप घेतला.
निधीत घट केली नसून, पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक इतर कामांसाठी केवळ 40 कोटी रुपयांचा निधी वळवला आहे. पवना जलवाहिनी प्रकल्प शहरासाठी आवश्यक असून, तो पूर्ण करण्यासाठी प्रसंगी कर्ज काढले जाणार आहे. त्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे शितोळे यांनी स्पष्ट केले.