

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना परवाने देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दहा क्षेत्रीय कार्यालयांकडून आतापर्यंत एकूण 111 मंडळांना परवाने देण्यात आले आहेत. तसेच, गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात एकूण 104 विसर्जन ठिकाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाची सुरुवात सोमवारी (दि.14) होणार आहे. त्यासाठी शहरातील हजारो सार्वजनिक मंडळांकडून मंडप उभारण्यात आले आहेत. शहरात लहान व मोठे तसेच, हाऊसिंग सोसायटीचे तीन हजारांपेक्षा अधिक मंडळे आहेत.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय परवानगी देण्यात आलेल्या मंडळांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. ब क्षेत्रीय कार्यालय 23, क क्षेत्रीय कार्यालय 2, ड क्षेत्रीय कार्यालय 16, ई क्षेत्रीय कार्यालय 15, फ क्षेत्रीय कार्यालय 17, ग क्षेत्रीय कार्यालय 20, ह क्षेत्रीय कार्यालय 15, ज क्षेत्रीय कार्यालय 2 आणि ल क्षेत्रीय कार्यालय 1 अशी एकूण 111 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित इतर मंडळांनी परवाना न घेता मंडप उभारला असल्याचे स्पष्ट होत आहे.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय अ क्षेत्रीय कार्यालय 10, ब 14, क 12, ड 12, इ 13, फ 11, ग 6, ह 12, ज 9 आणि ल 5 अशा एकूण 104 विसर्जन ठिकाणांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये.
तसेच, गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन ठिकाणांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.
नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे
गणेशोत्सवासाठी महापालिकेने आवश्यक नियोजन केले आहे. गणेशोत्सव मंडळांना परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. विसर्जनासाठीही मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.