पिंपरी: पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीत औद्योगिक भंगार व धातूचा कचरा उघड्यावर वाहून नेण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील प्रमुख रस्ते व उड्डाणपूल मार्गावर एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात धातूचे स्क्रॅप कोणतेही ताडपत्री किंवा सुरक्षात्मक जाळी न लावता वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
अशा प्रकारच्या निष्काळजी वाहतुकीमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघाताचा धोका वाढला आहे. औद्योगिक स्क्रॅप, लोखंडी तुकडे किंवा इतर भंगार साहित्य ट्रकमधून वाहतूक करताना ते व्यवस्थित झाकणे आणि सुरक्षितपणे बांधणे अपेक्षित असते.
मात्र अनेक वाहनांमध्ये हे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येते. वाहन चालू असताना लहान-मोठे तुकडे रस्त्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
याशिवाय उघड्यावर वाहतूक केल्यामुळे धूळ, कचरा आणि सूक्ष्म धातूचे कण हवेत पसरतात. याचा परिणाम पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. शहरातील औद्योगिक क्षेत्रात अशा वाहनांची नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
उघड्यावर औद्योगिक कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवावी. सर्व स्क्रॅप वाहतूक करणाऱ्या वाहनांना ताडपत्री किंवा सुरक्षात्मक जाळी बंधनकारक करावी. ओव्हरलोड व असुरक्षित वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करावी. औद्योगिक कंपन्यांना सुरक्षित वाहतुकीबाबत सक्त सूचना द्याव्यात. भंगार किंवा स्क्रॅपची वाहतूक करताना सुरक्षितता नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे,हवेत उडनारे कण डोळ्यात गेल्यास गंभीर इजा होउ शकते. उघड्यावर किंवा ओव्हरलोड वाहतूक केल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनांवर प्रशासनाकडून नियमित कारवाई करणे गरजेचे आहे. शहर वाहतूक विभागानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.जितेंद्र मोरे, दुचाकीस्वार