Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Nominated Corporators: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीचा मुहूर्त कधी? भाजपचे ७, राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक ठरणार

दहा महिन्यांपासून निवड प्रक्रिया रखडली; २० नोव्हेंबरच्या सभेकडे इच्छुकांचे लक्ष, भाजपकडे दीडशेहून अधिक जण प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा विषय सत्ताधारी भाजपकडून वारंवार पुढे ढकलला जात आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. येत्या शुक्रवारी (दि.20) होणार्‍या तहकूब सर्वसाधारण सभेत ही निवड केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिकेत सत्ताधारी भाजपाची सत्ता येऊन दहा महिने होत आले आहेत. त्यानंतर तब्बल दहा सर्वसाधारण सभाही झाल्या. मात्र, विरोधकांना कोंडीत धरण्यासाठी स्वीकृत दहा नगरसेवकांची निवड सतत लांबणीवर टाकली जात आहे. ३० ऑक्टोबरची तहकूब सभाही पुन्हा तहकूब करण्यात आली. दोन तहकूब सभा आणि नियमित मासिक सभा अशा तीन सभा 20 नोव्हेंबरला आयोजित केल्या आहेत. तहकूब सभेच्या विषयपत्रिकेवर क्रमांक एकवर स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय आहे. या सभेत स्वीकृत दहा जणांचा विषय मार्गी लागणार का, असा सवाल इच्छुकांकडून उपस्थित केला जात आहे.

इच्छुकांचा जीव टांगणीला

महापालिकेतील नगरसेवक संख्या बळानुसार भाजपाचे 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तिघा जणांची नावे सादर केली आहे. त्या नावासह सभागृहाच्या पटलावर निवडीचा प्रस्ताव पडून आहे. विरोधकांची कोंडी करण्यासाठी तसेच, सत्तेत भागीदार निर्माण होऊ नये, वाटेकरी वाढू नये, म्हणून भाजपाकडून त्या निवडी सातत्याने टाळल्या जात असल्याचे दिसत आहे. तत्कालिन राज्यपाल कोश्यारी यांनीही महाविकास आघाडीने दिलेल्या राज्यपाल नियुक्त 12 जणांच्या निवडीच्या यादी रोखून धरली होती. त्यामुळे त्या निवडी झाल्या नाहीत. असाच काहीचा प्रकार भाजपाकडून केला जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इच्छुकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्वीकृत नगरसेवकांचा मोठा कालावधी वाया

महापालिकेत नगरसेवकांचा कारभार 6 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. स्वीकृत नगरसेवकांची निवड लगोलग झाली असती तर, त्यांना आत्तापर्यंत सुमारे साडेनऊ महिन्यांचा कालावधी मिळाला असता. मात्र, निवड प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तो कालावधी वाया गेला आहे. अधिक जणांना संधी मिळावी, म्हणून भाजपाने अडीच वर्षांसाठी स्वीकृत नगरसेवक नेमण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन, दोन वर्ष आणि 1 वर्ष असा कालावधी निश्चित केला होता. त्यामुळे अनेकांना संधी मिळणार आहे.

दीडशेपेक्षा अधिक 'वेटिंग'वर

सत्ताधारी भाजपाकडे दीडशेपेक्षा अधिक जण स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत. माजी नगरसेवक, पराभूत नगरसेवक, माघार घेणारे इच्छुक, निवडणुकीत पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते तसेच, पक्षाचे पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, संस्थाचालक तसेच, निष्ठावंत, आरएसएस, हिंदुत्वादी संघटना, बजरंग दल, कामगार संघटनेचे पदाधिकारीही नगरसेवक होण्यासाठी बोहल्यावर चढले आहेत. आपली वर्णी लागावी म्हणून शहराध्यक्षांसह महापौर आणि आमदारांकडे शिफारशी करण्यात आल्या आहेत. तसेच, प्रदेश पदाधिकारी, मंत्री यांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. काहींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सात नावांवर एकमत होत नसल्याचा दावा भाजपने केला आहे.

'स्वीकृत नगरसेवकांसह सर्व विषय मार्गी लावणार'

महापालिकेची शुक्रवारी सर्वसाधारण सभा आहे. त्या सभेतील सर्वच विषय मार्गी लावले जाणार आहे. तसेच, स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT