संतोष शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल विविध गुन्ह्यांतील तब्बल ७३ आरोपी 'वॉन्टेड' आहेत. शहरात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी या फरार आरोपींचा शोध महत्त्वाचा ठरत असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली आहे. स्टँडिंग वॉरंट, फरारी उद्घोषणा आणि आवश्यकतेनुसार मालमत्ता जप्तीच्या माध्यमातून आरोपींवर कायदेशीर दबाव वाढविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक, आयटी आणि शैक्षणिक केंद्र आहे. शहरात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा असते. पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिकसह महत्त्वाचे मार्ग शहर परिसराला जोडलेले असल्याने अमली पदार्थांची वाहतूक आणि स्थानिक पातळीवरील वितरण रोखणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.
अमली पदार्थांच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष मुद्देमालासह पकडलेली व्यक्ती ही अनेकदा तस्करीच्या साखळीतील केवळ एक कडी असते. मालाचा मूळ पुरवठादार, वाहतूक करणारे, साठवणूक करणारे आणि स्थानिक पातळीवर विक्री करणारे अशा विविध स्तरांवर नेटवर्क कार्यरत असू शकते. त्यामुळे संबंधित गुन्ह्यातील फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यास पुरवठ्याचा स्रोत आणि वितरणाचे पुढील धागेदोरे उलगडण्यास मदत होऊ शकते. या पार्श्वभूमीवर एनडीपीएस गुन्ह्यांतील ७३ 'पाहिजे' आरोपींविरोधात संबंधित तपासी अधिकाऱ्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बीएनएसएस कलम ७५ अन्वये स्टँडिंग वॉरंट, कलम ८४ अन्वये फरारी उद्घोषणा आणि कलम ८५ अंतर्गत उद्घोषित आरोपीच्या मालमत्ता जप्तीसाठी कार्यवाही केली जाणार आहे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
तरुणाईभोवती व्यसनाचा धोका
अमली पदार्थांची उपलब्धता ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही. तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकल्यास त्याचे परिणाम शिक्षण, रोजगार, कुटुंब आणि सामाजिक आयुष्यावर होतात. व्यसनासाठी पैशांची गरज निर्माण झाल्यानंतर चोरी, घरफोडी किंवा अन्य गुन्ह्यांकडे वळण्याचाही धोका असतो. त्यामुळे अमली पदार्थांच्या किरकोळ विक्रीपेक्षा त्यामागील पुरवठा बंद करण्यावर पोलिसांचा भर आहे.
जनजागृतीवरही भर
कारवाईबरोबरच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये, आयटी कंपन्या आणि तरुणांची वर्दळ असलेल्या भागांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली जात आहे. मागील काळात पोलिसांनी शैक्षणिक संस्था आणि आयटी कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष संवाद साधला. गणेशोत्सव काळातही मंडळांच्या माध्यमातून नागरिकांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मोबाईल, बँक व्यवहारांवरही नजर
फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याचे मोबाईल संपर्क, बँक व्यवहार, सहआरोपींशी असलेले संबंध आणि मालाच्या वाहतुकीचा मार्ग तपासला जातो. आरोपी परजिल्ह्यात किंवा परराज्यात असल्यास संबंधित पोलिसांशी समन्वय साधून शोध घेतला जातो. अशा तपासातून स्थानिक विक्रेत्यापासून मूळ पुरवठादारापर्यंतचा दुवा मिळू शकतो.
फरार आरोपींची कोंडी
प्रत्यक्ष शोध घेऊनही आरोपी सापडत नसल्यास न्यायालयीन प्रक्रियेद्वारे त्यांच्यावर दबाव वाढविण्यात येत आहे. फरारी उद्घोषणेनंतरही आरोपी न्यायालयासमोर हजर न झाल्यास कायद्यातील तरतुदीनुसार मालमत्ता जप्तीची पुढील प्रक्रिया करता येते. त्यामुळे दीर्घकाळ फरार राहून तपास टाळणाऱ्या आरोपींची कोंडी करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
पोलिस ठाणे - वाँटेड आरोपी संख्या
पिंपरी - ४
चिंचवड - ४
संत तुकाराम नगर - १
सांगवी - ६
हिंजवडी - ४
बावधन - ६
वाकड - ५
काळेवाडी - १
एमआयडीसी भोसरी - ५
भोसरी - २
चाकण उत्तर - १३
चाकण दक्षिण - ४
शिरगाव - २
तळेगाव दाभाडे - ५
तळेगाव एमआयडीसी - १
दक्षिण महाळुंगे - २
चिखली - ४
दिघी - ४
एकूण - ७३
अमली पदार्थांसह आरोपी पकडल्यानंतर तपास थांबत नाही. माल कुठून आला, त्यामागील पुरवठादार कोण आणि पुढे कोणाकडे जाणार होता, याच्या मुळापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न असतो. तस्करीची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करणे हे कारवाईचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार फरार आरोपींभोवती न्यायालयीन प्रक्रियेद्वारे फास आवळण्याचे काम सुरू आहे.रोहिदास पवार, उपायुक्त, गुन्हे शाखा पिंपरी - चिंचचवड