PCMC Footpath Encroachment: पदपथावर अतिक्रमण, सायकल ट्रॅकवर वाहने; आता मालवाहू वाहनांचा ठिय्या!

फुटपाथ अन्‌ सायकल ट्रॅक बंद; जड वाहनांमुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका, नागरिकांचा सवाल—‘चालायचे कुठून?’
Footpath Encroachment
Footpath EncroachmentPudhari
Published on
Updated on

पिंपरी: शहरातील पादचारी मार्ग, फुटपाथ आणि सायकल ट्रॅक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असतानाच आता या मार्गांवर मालवाहू वाहने उभी करून मालाची चढ-उतार केली जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. काही ठिकाणी ही वाहने रस्त्यावर आडवी उभी राहत असल्याने पदपथ आणि सायकल ट्रॅक तर बंद होतातच; तसेच मुख्य रस्त्याचा मोठा भाग व्यापला जात असल्याने वाहतूक कोंडीची भर पडत आहे. त्यामुळे ‘साहेब, आम्ही चालायचे कुठून?’ असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Footpath Encroachment
PCMC New Municipal Building: पिंपरी-चिंचवडच्या नव्या महापालिका भवनाचा खर्च वाढणार; २८६ कोटींच्या प्रकल्पावर आणखी कोट्यवधींचा भार

पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या सुविधांचा वापर पादचाऱ्यांऐवजी वाहनांसाठी होताना दिसतो. दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि गोदामांच्या परिसरात माल उतरविण्यासाठी मोठी वाहने थेट पदपथालगत किंवा सायकल ट्रॅकवर उभी केली जातात. वाहनाचा आकार मोठा असल्याने एकाच वेळी पदपथ सायकल ट्रॅक आणि रस्त्याचा काही भाग व्यापला जातो.यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालण्याची वेळ येते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग नागरिकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. सायकलस्वारांनाही ट्रॅक सोडून वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे.

Footpath Encroachment
PCMC DP Plan Objections: पिंपरी-चिंचवडच्या डीपी प्लानवरील ५६ हजार ७७९ हरकती; निम्म्या हरकतींवर सुनावणी पूर्ण

भरदिवसा जड वाहनांचा ठिय्या

शहरातील प्रमुख मार्गांवर दिवसाच्या वर्दळीच्या वेळेत मोठी मालवाहू वाहने उभी करून मालाची चढ-उतार केली जात असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. एखादे अवजड वाहन रस्त्यावर आडवे उभे राहिल्यास मागील वाहनांची रांग लागते. काही ठिकाणी वाहनचालकांना लेन बदलावी लागते, त्यामुळे कोंडीसोबतच अपघाताचा धोका वाढतो. शहरातील विविध व्यापारी भागांमध्ये मालवाहू वाहनांसाठी निश्चित चढ-उतार व्यवस्था आहे का, कोणत्या वेळेत मोठ्या वाहनांना प्रवेश दिला जातो आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर किती कारवाई होते, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.

कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण

महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाते. मात्र कारवाईनंतर काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी वाहने उभी राहत असल्याचे चित्र अनेक भागांत दिसते. त्यामुळे केवळ कारवाई करून प्रश्न सुटणार नसून कारवाईनंतर त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी सातत्याने देखरेख करण्याची गरज आहे.

Footpath Encroachment
Chinchwad Cyber Security Awareness: गणेश मंडळांमध्ये सायबर सुरक्षेचा जागर; चिंचवडमध्ये पोलिसांकडून नागरिकांना मार्गदर्शन

पदपथांचे नुकसान; सार्वजनिक पैशांचा अपव्यय

मोठ्या वाहनांची सततची ये-जा आणि त्यावर होणारा भार यामुळे अनेक ठिकाणी पदपथावरील पेव्हर ब्लॉक तुटलेले किंवा खचलेले दिसतात. नागरिकांच्या वापरासाठी तयार करण्यात आलेल्या पादचारी मार्गाची दुरवस्था होत असताना त्यावर पुन्हा दुरुस्तीचा खर्च करावा लागतो. त्यामुळे एकीकडे सार्वजनिक निधीतून सुविधा उभारायच्या आणि दुसरीकडे त्यांचे संरक्षण न केल्याने त्या खराब होऊ द्यायच्या, अशी विसंगत स्थिती निर्माण झाली आहे.

सायकल ट्रॅकचा उद्देशच हरवला

सायकलस्वारांना सुरक्षित मार्ग मिळावा, वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळावी, या उद्देशाने सायकल ट्रॅक उभारण्यात आले. मात्र त्याच ट्रॅकवर वाहने उभी राहत असतील तर या सुविधेचा उद्देशच बाजूला पडतो. सायकलस्वारांना ट्रॅक सोडून पुन्हा मुख्य रस्त्यावर यावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.

Footpath Encroachment
Kasarwadi Water Supply: कासारवाडीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १.१६ कोटींचा खर्च; महापालिकेची निविदा मंजूर

नियोजन की केवळ दिखावा

शहराच्या विकासात रस्ते रुंदीकरण, बीआरटी मार्ग, फुटपाथ आणि सायकल ट्रॅक यांसारख्या पायाभूत सुविधांवर मोठा भर दिला जात आहे. मात्र या सुविधांचा प्रत्यक्ष वापर सुरक्षितपणे आणि अडथळ्याविना होतो आहे का, याकडेही प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. फुटपाथवर अतिक्रमण, सायकल ट्रॅकवर पार्किंग आणि रस्त्यावर मालवाहू वाहनांचा ठिय्या अशी परिस्थिती असेल तर शहराच्या वाहतूक नियोजनाचा फेरआढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील पादचारी मार्ग हे वाहनतळ किंवा माल उतरविण्याची जागा नसून नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनांसाठी निश्चित माल चढ-उतार क्षेत्रे, वेळेचे काटेकोर नियमन, फुटपाथ आणि सायकल ट्रॅकवरील अतिक्रमणावर सातत्यपूर्ण कारवाई आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.

पदपथावर दुकाने, सायकल ट्रॅकवर वाहने आणि आता मोठे ट्रकही रस्त्यावर उभे राहून माल उतरवत आहेत. आम्ही चालायचे कुठून? वारंवार पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होत असेल तर कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार?

रवि मुळीक, नागरिक

शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी जड वाहने, रस्त्यावर अनधिकृतपणे पार्क केलेली वाहने तसेच माल चढ-उतार करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई केली जाते. नागरिकांना वाहतुकीस अडथळा होणार नाही, यासाठी संबंधित ठिकाणी पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.

डॅा. निलेश देशमुख सहाय्यक वाहतूक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news