पिंपरी: समृद्ध अधिवासाचे प्रतीक, शेतकर्यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शहरातील महिलांनी नागपंचमी उत्साहात साजरी केली. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्र आल्याने सर्व महादेव मंदिरातदेखील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. महिलांनी या वेळी नागाच्या मूर्तीला दूध व लाह्या वाहिल्या.
महिलांनी भरपावसातही पारंपरिक वेशभूषा करून फुगडी, फेरी आणि गाणी यांचा मनसोक्त आनंद लुटला. काही ठिकाणी झोपाळ्याचा आनंद लुटत नागपंचमीचा आनंद द्विगुणित केला. नागपंचमी हा श्रावणातील महत्त्वाचा सण. या दिवशी शंकर आणि नागाचे पूजन करून पुरणाचे दिंड करण्याची प्रथा आहे. या वेळी महिलांनी घरातच नागाच्या प्रतिमेचे तर काहींनी वारुळाचे पूजन केले. बाजारपेठेत नागाच्या आखीवरेखीव मूर्तीही विक्रीस उपलब्ध होत्या. महिलांना या प्रतिमांचे पूजन केले. सणानिमित्त घरोघरी पुरणाचे दिंड करून देवाला नैवेद्य दाखविण्यात आला.
नागपंचमीनिमित्त शहरातील मंदिरासमोर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नऊवारी, नथ, दागदागिन्यांचा साज घेतलेल्या महिलांचा उत्साह अवर्णनीय होता. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नागदेवतेची पूजा करतात. स्त्रिया पाटावर नागदेवतेची रांगोळी रेखाटून त्याची पूजा करतात.
बाजारातदेखील नागाच्या मूर्ती, पूजेचे साहित्य, लाह्या विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती. शहर परिसरातदेखील उद्यानामध्ये सार्वजनिकरित्या नागपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून विविध गाणी गाऊन नागपंचमी सण उत्साहात साजरा केला. शाहूनगर, संभाजीनगर आणि निगडी याठिकाणी महिलांनी झोके, फुगड्या, फेर आणि पारंपरिक खेळ खेळून नागपंचमीचा आनंद लुटला.
सर्पमित्रांचा सत्कार
दरवर्षी मैत्री महिला व्यासपीठतर्फे नागपंचमी सणानिमित्त झिम्मा, फुगडी, झोका आणि विविध खेळांचे आयोजन केले होते. त्यासोबतच परिसरातील सर्प मित्रांचा सन्मान सत्कार मैत्री व्यासपीठतर्फे करण्यात आला.