पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेतील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) तसेच, खुल्या गटातील या सर्व राखीव जागांवर महिलांसाठी असलेल्या जागेचे चित्र कसे असेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आरक्षण सोडतीवर अनेकांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. ती सोडत दिवाळीच्या धामधुमीनंतर होईल, असे सूत्रांनी सांगितले.(Latest Pimpri chinchwad News)
महापालिकेच्या 4 सदस्यीय 32 प्रभागांची रचना सोमवारी (दि. 6) अंतिम झाली. त्यात एकूण 128 जागा आहेत. त्यात केवळ सहा प्रभागांत बदल करण्यात आले आहेत. त्या फोडाफोडीचा परिणाम सहापेक्षा अधिक प्रभागांवर झाला आहे. लोकसंख्येसह एससी व एसटी लोकसंख्येची आकडेवारी बदलल्याने त्या वर्गाच्या आरक्षणात बदल झाले आहेत. त्यामुळे ज्या प्रभागात एससी व एसटीचे आरक्षण नव्हते, तेथेही हे आरक्षण पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्यायकारकपणे प्रभागांची फोडाफोडी केल्याचा आरोप करीत काही इच्छुकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. आता राज्यातील महापालिकेच्या प्रभागाची आरक्षण सोडत कधी निघणार, याकडे सर्व इच्छुकांच्या नजरा खिळल्या आहेत. कोणत्या प्रभागात एससी आणि एसटीचे आरक्षण पडेल, ते प्रभागातील लोकसंख्येच्या आकडेवारीच्या तक्त्यावरुन उघड झाले आहे. त्याबाबत पुढारीने सविस्तर वृत्त बुधवारी (दि. 8) प्रसिद्ध केले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या जातात. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून पारदर्शक ड्रममधून चिठ्ठी काढली जाते. त्यानुसार, त्या प्रभागात महिला व पुुरुष असे आरक्षण निश्चित केले जाते. यंदा आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील निवडणुकीसाठी प्रा. मोरे प्रेक्षागृहात 30 जुलै 2022 ला आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यात 46 प्रभागातील एकूण 139 जागांपैकी 114 जागांची सोडत काढली गेली. मात्र, ती निवडणूक प्रकिया पुढे रद्द झाली होती. फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीची सोडतही तेथेच काढण्यात आली होती.
शहराची लोकसंख्या (2011 च्या जनगणनेनुसार)
एकूण लोकसंख्या :17 लाख 27 हजार 692
एससी लोकसंख्या : 2 लाख 73 हजार 820
एसटी लोकसंख्या : 36 हजार 535
राज्य निवडणूक आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेस आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्राप्त झालेला नाही. त्याबाबतच्या वेळापत्रकानुसार महापालिकेकडून जाहीरपणे सर्वासमोर आरक्षण सोडत काढली जाईल. त्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाने तयारी केली आहे.अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, महापालिका
एससीच्या 20, एसटीच्या 3 जागेनंतर ओबीसीसाठी 35 जागांवर तसेच, खुल्या गटातील 35 जागांवर महिलांचे आरक्षण पडणार आहे. प्रभागातील अ, ब, क आणि ड या जागा कोणाला सुटणार, एकूण 128 पैकी महिलांसाठी कोणत्या प्रभागातील जागा सुटणार, याबाबत इच्छुकांसह माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. राखीव जागेवरील खुल्या गटात पुरुषांना लढता येते. मात्र, खुल्या गटातील जागेवर पुरुषांसोबत महिलांनाही लढता येते. त्यामुळे सर्व 32 प्रभागाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. आरक्षणांचे चित्र उघड झाल्यानंतर अधिक सुरक्षित जागेवर लढण्याच्या तयारीत इच्छुक आहेत. जागा न सुटल्यास लढायचे किंवा नाही याचाही ते विचार करणार आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे.