पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून (दि. 23) सुरुवात होत आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज स्वीकृतीची मुदत 30 डिसेंबरपर्यंत आहे.
महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारांना प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज 30 डिसेंबर 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत. तर, अंतिम दिवसापर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत उमेदवार अर्ज घेऊन जाऊ शकतात. यासाठी प्रत्येक कार्यालयात आवश्यक प्रशासकीय यंत्रणा, कर्मचारी तसेच, तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे तसेच, शुल्क वेळेत सादर करणे आवश्यक आहे.
प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी 31 डिसेंबरला होणार असून, उमेदवारी अर्ज माघारीसाठी 2 जानेवारी 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. चिन्हवाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026 ला प्रसिद्ध केली जाणार आहे.
उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक
महापालिकेकडून मध्यवर्ती निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारकआहे. उमेदवारांनी निवडणूक खर्च स्वतंत्र बॅंक खात्यातून करणे आवश्यक आहे. उमेदवारांना प्राप्त होणारा निधी देणगीबाबतच्या तपशीलाची (स्वनिधी, पक्षनिधी, भेट, कर्ज) माहिती नमुना क्रमांक 1 व उमेदवाराने केलेल्या खर्चाच्या तपशीलाची माहिती नमुना क्रमांक 2 मध्ये निवडणूक निकाल लागल्यापासून 30 दिवसांच्या आत नमुना क्रमांक 3 मधील प्रतिज्ञापत्रासह सादर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षामार्फत उमेदवारांकडून निवडणूक प्रचाराकरिता सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या प्रचार साहित्य किंवा बाबींकरिता प्रचलित स्थानिक दरसूची तयार केली आहे. दरसूची तसेच, नमुना क्रमांक 1 व 2 ची पुस्तिका सर्व संबंधित उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे अनुषंगाने सादर करावयाच्या बिलांकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयामध्ये स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे
..तर उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो
उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी उमेदारी अर्ज प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे. उमेदवारी अर्जात कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधित उमेदवारी अर्ज बाद होऊ शकते, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.