पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांनी अखेरच्या क्षणाला उमेदवार दिले आहेत. त्यामुळे प्रचारात अनेक प्रभागात संपूर्ण पॅनलचे एकमत झालेले दिसून आले आहेत. त्यात बहुसंख्य उमेदवारांनी एक मत द्या, असे आवाहन मतदारांना केले. तसेच, अनेक प्रभागात निष्ठावंत व जुने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.15) होणाऱ्या मतदानात क्रॉस व्होटिंग होण्याची दाट शक्यता आहे. त्याचा फटका कोणाला बसणार यांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तब्बल 9 वर्षांनंतर महापालिकेची 128 पैकी 126 जागांसाठी उद्या मतदान होत आहे. त्यात 697 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
सर्वच पक्षात शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी हे नगरसेवक पदासाठी इच्छुक होते. अनेक माजी नगरसेवकांनी प्रभागातील इतर सक्षम कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुकीची तयारी केली होती. भाजपा तसेच, राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार) पक्षांने दुसऱ्या पक्षातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देवून उमेदवारी दिली.
हा घोळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होता. त्यामुळे पूर्वी ठरवलेले पॅनल अनेक प्रभागात फुटले. प्रचारात पॅनलमध्ये समन्वय दिसून आला नाही. प्रत्येक उमेदवार आपआपल्या परिने प्रचार यंत्रणा राबवत होता. त्यातील काहींनी एकासाठीच मते मागितली. त्यामुळे पॅनलच्या इतर उमेदवारांना क्रॉस व्होटींगचा फटका बसणार आहे.
दुसरीकडे उमदेवारी न मिळाल्याने निष्ठावंत व जुन्या कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर कायम होता. त्यामुळे यंदाच्या प्रचारात कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होता. पक्षाची संघटनात्मक ताकद कमी पडल्याचे दिसून आले. त्यासंदर्भात अनेक बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. सक्त सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यात काही सुधारणा झाली नसल्याचे प्रचार पद्धतीवरून स्पष्ट झाले. नाराज कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या विरोधात काम केल्याचे सांगितले जात आहे.
तसेच, बंडखोऱ्यांकडून पक्षाची मते खेचली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांमध्येही संभम निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम क्रॉस व्होटिंगवर होण्याची शक्यता आहे. तसेच, नाराजी म्हणून नोटाला पसंती दिली जाऊ शकते. तसेच, मतदानात नागरिकांची उदासीनता दिसू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या क्रॉस व्होटींगचा फटका कोणाला बसणार, कोणाला त्याचा फायदा होणार, अनपेक्षितपणे कोणाची लॉटरी लागणार, यांचा अंदाज बांधला जात आहे. त्यावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत.