पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीतील भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवार फोडाफोडीचे सत्र तापले आहे. पक्षप्रवेशाची ही मालिका अजून सुरू असून, उमेदवार पळविण्याचा सिलसिला मंगळवार (दि. 23) ही कायम होता. या घमासानामुळे शहरातील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांचे माजी नगरसेवक तसेच, दिग्गज उमेदवार फोडत आहेत. दुसऱ्या पक्षातील दिग्गजांचे पक्षात स्वागत करत थेट उमेदवारी दिली जात आहे. त्यातून आपला पक्ष अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत फोडाफोडीचे प्रकार एक एक करून समोर आले. ‘ना भूतो... अशी फोडाफोडी सुरू आहे. त्यामुळे मतदारांसह राजकीय तज्ज्ञांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उमेदवारी अर्ज सुरू करण्यास सुरुवात झाली असतानाही, दोन्ही पक्षांकडून सुरू असलेल्या या फोडाफोडीच्या राजकारणामुळे निवडणुकीचे वातावरण तापले आहे. उमेदवार पळवापळवीची या प्रकारांवरून मतदारांमध्ये उलट-सुलट चर्चा केली सुरू आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज 30 डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत आहे. त्या दिवसापर्यंत ही फोडाफोडी सुरू राहील, असे दोन्ही पक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे स्पष्ट होत आहे.
चिन्ह कोणते?
भाजपाकडून व राष्ट्रवादीकडून तिकीट मिळविण्यासाठी तसेच, विजयाची खात्री असल्याने आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचा आधार घेतला जात आहे. आपल्या पक्षाचा शिक्का पुसून, नव्या पक्षाच्या चिन्हासह मतदारांसमोर जाण्यासाठी पक्ष बदलू उमेदवारांसमोर आहे. प्रचारासाठी असलेल्या कमी कालावधीत प्रभागात सर्व मतदारांपर्यंत नवे चिन्ह पोहचविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. मतदारांपर्यंत चिन्ह न पोहचल्यास तसेच, मतदारांनी चेहरा म्हणून मतदान केल्यास दल बदलूंना नव्या चिन्हाचा फटका बसू शकतो.
मंगळवारी झालेले पक्षप्रवेश
शिवसेनेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलेले महापालिकेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या वेळी निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे व पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाच्या मोरवाडी कार्यालयात सायंकाळी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनुराधा गोफणे व त्यांचे पती देवीदास गोफणे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, उल्हास शेट्टी, कै. खासदार गजानन बाबर यांचे बंधू शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश बाबर, माजी नगरसेविका शारदा बाबर, अमित बाबर, ऐश्वर्या बाबर यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार महेश लांडगे, अमित गोरखे व पदाधिकारी उपस्थित होते.
तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. भाजपाचे पदाधिकारी गणेश लंगोटे व त्यांच्या पत्नी, भाजपातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलेले माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे व त्यांची मुलगी दिप्ती कांबळे, शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी विशाल काळभोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. या वेळी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, उर्मिला काळभोर आदी उपस्थित होते.