Pimpri Chinchwad Municipal Corporation Expenses Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Municipal Corporation: पिंपरी-चिंचवड महापालिकेची उधळपट्टी? तिरंगा अभियानावर २१ लाख; विविध खर्चांना स्थायी समितीची मंजुरी

आयटीआयच्या जपानी-जर्मन अभ्यासक्रमासाठी ३२ लाख; पालखी सोहळ्यातील टोप्या-बॅचवरही साडेसहा लाखांचा खर्च

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा अभियान राबण्यात आले. त्याअंतर्गत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजनासाठी 21 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यासह विविध विकासकामांच्या खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि.19) मंजुरी दिली आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते. या वेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, नगर सचिव अण्णा बोदडे, समितीचे सदस्य, विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. शहर अभियंतापदी मनोज सेठिया यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सभेत घरोघरी तिरंगा अभियानाच्या खर्चास मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाच्या आदेशावरून महापालिकेने घरोघरी तिरंगा अभियान शहरात राबवले. त्यात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा बाईक व सायकल रॅली, सार्वजनिक ठिकाणी तिरंगा प्रदर्शन, सेल्फी पॉईट, कॅनव्हास, फ्लेक्स, आदी खर्च करण्यात आला आहे. हे कार्यक्रम 9 ते 17 ऑगस्ट या कालावधी राबवल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यासाठी एकूण 21 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. या खर्चात झेंडे खरेदीचा खर्चाचा समावेश नाही.

महापालिकेसाठी आकुर्डी येथे कार्यरत असलेल्या न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयातील न्यायाधीश, अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 17 जणांच्या वेतन व भत्त्यांच्या आस्थापना खर्चाची शासन निर्णयानुसार प्रतिपूर्ती करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचा महिन्याचा खर्च 15 लाख 37 हजार 783 आहे. एका वर्षाचा खर्च 1 कोटी 84 लाख 53 हजार 396 रुपये आहे.

निगडी, सेक्टर क्रमांक 23 आणि चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रांसाठी 1 कोटी 15 लाख 76 हजार किमतीचे आवश्यक पावडर पॉली इलेक्ट्रोलाईट रसायन खरेदी करण्यास मान्यता दिली. तसेच, या दोन केंद्रांतील निर्जंतुकीकरण प्रक्रियेसाठी स्टेबल ब्लिचिंग पावडरसाठी 97 लाख 47 हजार रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.

यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम)रुग्णालयातील वॉर्डांमधून निर्माण होणार्‍या जैववैद्यकीय कचर्‍याची (मेडिकल वेस्ट) सुरक्षित विल्हेवाट लावण्याचे काम पास्को एनव्हायमेंटल सोल्यूशन प्रा. लि. संस्थेकडून केले जाते. त्यासाठी सुमारे 10 लाख खर्चाच्या लाल रंगाचे 500 आणि पिवळ्या रंगाच्या 550 पिशव्या खरेदी करण्यात येणार आहेत.

आयटीआयमध्ये जपान, जर्मन अभ्यासक्रम

महापालिकेच्या मोरवाडी व कासारवाडी येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दापोडी येथील नालंदा फाउंडेशनच्या वतीने जपान व जर्मन भाषा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यासाठी 32 लाख 46 हजार 300 रुपये खर्च अपेक्षित आहे. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना भाषा प्रशिक्षणासोबत आंतरराष्ट्रीय भाषा परीक्षांचे मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य, आवश्यक पुस्तके, अभ्यास साहित्य, अधिकृत प्रमाणपत्र आणि भारतात किंवा परदेशात रोजगारासाठी प्लेसमेंट सपोर्ट उपलब्ध करून दिला जाणार आहे.

पालखी सोहळ्यात टोप्यांसाठी साडेसहा लाखांचा खर्च

जगद्गगुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी महापालिकेने टोप्या व बॅच खरेदी केल्या होत्या. त्यावर छपाई करून घेण्यात आली. एकूण 2 हजार 500 टोप्यासाठी 6 लाख 30 हजार रुपये खर्च करण्यात आला. तसेच, तीन हजार बॅचसाठी 52 हजार 500 रुपये असे एकूर 6 लाख 82 हजार 500 रुपये खर्च करण्यात आला. त्या खर्चास स्थायी समितीने कार्यात्तर मान्यता दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT