Maymer Hospital Pregnant Woman Death: गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; सिझेरियननंतर बाळाचाही मृत्यू, नातेवाईकांचा हलगर्जीपणाचा आरोप

मायमर रुग्णालयातील घटनेनंतर तणाव; वैद्यकीय निष्काळजीपणाची तज्ज्ञ समितीकडून चौकशी, एसआयटी तपासाची घोषणा
Doctor negligence case
Doctor negligence casePudhari
Published on
Updated on

पिंपरी: नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोटातील बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन केले. काही तासातच बाळाची प्रकृती खालावल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगरमधील मायमर रुग्णालयात मंगळवारी (दि. १८) ही घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात संताप व्यक्त केला. रूपाली सोमनाथ इंदलकर (३८, रा. कुसगाव, मावळ) असे मृत महिलेचे नाव आहे.

Doctor negligence case
Pimpri Chinchwad Municipal Corporation Policies: पिंपरी-चिंचवड महापालिकेत धोरणांचा ‘पाऊस’; खासगी सल्लागारांवर लाखोंचा खर्च, अंमलबजावणीचा मात्र प्रश्न

वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले.

Doctor negligence case
Pimpri Chinchwad Accepted Corporators: स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार?; पिंपरी-चिंचवड महापालिका सभेकडे लक्ष

उपचार सुरू असतानाच सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास रूपाली यांना स्ट्रोक आला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोटातील बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळाला बाहेर काढले. सुरुवातीला बाळावर मायमर रुग्णालयातच उपचार सुरू होते. मात्र, रात्री नऊच्या सुमारास बाळाची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून बाळाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

Doctor negligence case
Pimpri Chinchwad SIR Voter Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये ६ लाख ८ हजार मतदार गायब; मतदारसंख्येत मोठी घट

आईपाठोपाठ बाळाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर इंदलकर यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. उपचारात हलगर्जीपणा झाल्यामुळेच रूपाली आणि त्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी (दि. १९) सकाळी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयात धाव घेतली. पोलिस आणि लोकप्रतिनिधींनी नातेवाईकांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.

Doctor negligence case
Kasarwadi Nashik Phata Road Potholes: कासारवाडी-नाशिक फाटा मार्गाची चाळण; ‘खड्डे चुकवा, जीव वाचवा’ची वाहनचालकांवर वेळ

या घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करून तपास करण्यात येईल. दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

सुनील शेळके, आमदार

मायमर रुग्णालयातील गर्भवती महिला आणि बाळाच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय निष्काळजीपणा झाला की नाही, याबाबत ससून रुग्णालयातील तज्ज्ञ समितीकडून वैद्यकीय अभिप्राय घेतला जाणार आहे. उपचारांची कागदपत्रे, तपासणी अहवाल आणि अन्य वैद्यकीय नोंदींची समितीकडून छाननी केली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

किशोर पाटील, वरिष्ठ निरीक्षक, तळेगाव पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news