Transfer Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Officers Transfer Order: खाबूगिरीला आळा घालण्यासाठी महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या

एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांवर कारवाईचे महापौर रवी लांडगे यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत खाबूगिरी बंद करण्यासाठी महापालिका आस्थापनेवरील एकाच विभागात दीर्घकाळ ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करा, असे आदेश नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.

महापौर लांडगे म्हणाले की, महापालिकेच्या विविध विभागांतील कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणणे हे आपले प्रमुख ध्येय आहे. मात्र, महापालिकेच्या आस्थापनेवरील अनेक अधिकारी व कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अधिक काळ एकाच विभागात किंवा एकाच पदावर ठाण मांडून बसले आहेत.

स्थापत्य, पर्यावरण, नगररचना, बांधकाम परवाना, आरोग्य, वैद्यकीय, करसंकलन, भांडार आणि उद्यान यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लेखापाल, भांडारपाल व अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत.

एकाच विभागात दीर्घकाळ राहिल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्थानिक स्तरावर हितसंबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामांत अर्थपूर्ण वाटाघाटी आणि भष्टाचाराला वाव मिळत आहे. हे महापालिकेच्या प्रतिमेसाठी अत्यंत घातक आहे. अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यानंतरही नियमानुसार त्यांची बदली दुसऱ्या विभागात होणे अपेक्षित होते. मात्र, विभागप्रमुखांच्या मर्जीतील असल्याने पदोन्नती मिळूनही ते त्याच जुन्या विभागात कार्यरत आहेत.

विभागप्रमुखांकडून आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना सोडण्यास होणारा विरोध आणि प्रशासनाचे या विषयाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत आहेत. पारदर्शकतेला हरताळ फासला जात आहे. यासाठी एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने इतरत्र बदली करून प्रशासनात फेरबदल करण्यात यावेत. या विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ कार्यवाही करावी. केलेल्या कारवाईचा अहवाल महापौर कार्यालयास सादर करावा, असे आदेश महापौरांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT