पिंपरी: पावसाळ्यात अतिवृष्टी, पाणी साचणे व पूरपरिस्थितीवर तातडीने नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आठ क्षेत्रीय कार्यालयांकडून 24 बाय 7 पूरनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षांमुळे नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे व आवश्यक मदतकार्य तत्काळ पोहोचवणे शक्य होणार आहे.
अग्निशामक विभाग सतर्क
अग्निशामक विभागामार्फत रबर बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोरखंड, फ्लड रेस्क्यू साहित्य आणि प्रशिक्षित पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या भागांमध्ये बचाव पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर जलद प्रतिसाद पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचावकार्य राबविण्यात येणार आहे. नावाडी, जीवरक्षक, सर्पमित्र, स्वयंसेवक व सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून तातडीने प्रतिसाद देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धोकादायक झाडांची छाटणी करण्यात येणार
आरोग्य विभागामार्फत धुरीकरण, औषध फवारणी, निर्जंतुकीकरण व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व रुग्णालये, दवाखाने, रुग्णवाहिका आणि औषधसाठा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मदत शिबिरांमध्ये स्वच्छता, शौचालय व्यवस्था, पिण्याचे पाणी व आरोग्यविषयक सुविधा नियमित उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. उद्यान विभागामार्फत धोकादायक झाडांची छाटणी, वीज वाहिन्यांवरील फांद्या हटविणे तसेच, वादळामुळे पडलेली झाडे तातडीने हटविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
धोकादायक होर्डिंग्जची तपासणी
शहरातील होर्डिंग्ज, फ्लेक्स, मोबाइल टॉवर्स तसेच, इतर धोकादायक संरचनांची तपासणी केली जात आहे. आवश्यकतेनुसार दुरुस्ती किंवा हटविण्याची कारवाई महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभाग व क्षेत्रीय कार्यालयांकडून केली जात आहे.
महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय सतर्क
पावसाळ्याच्या काळात पूरस्थिती व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने सर्व विभागांचा समन्वय साधून व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची हानी टाळणे, तात्काळ मदत व बचावकार्य प्रभावीपणे राबविणे आणि आवश्यक नागरी सुविधा अखंडित ठेवणे यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे. सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
नागरिकांच्या स्थलांतरासाठी यंत्रणा सज्ज
मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देता यावा, यासाठी सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूरनियंत्रण, बचावकार्य, नागरिकांचे स्थलांतर, मदत शिबिरे, आरोग्य सुविधा, पाणी उपसा यंत्रणा तसेच, व्यवस्था सज्ज ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी दिली.
नदीकाठावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पवना, इंद्रायणी व मुळा नदीकाठावरील झोपडपट्ट्या, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तसेच, पूरप्रवण भागांचे सर्वेक्षण करून कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय, धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधितांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, गटारसफाई, पाण्याचा निचरा व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे.
महापालिकेचा मान्सून कृती आराखडा
पूर, अतिवृष्टी तसेच आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी महापालिकेने मान्सून कृती आराखडा 2026 तयार केला आहे. नागरिकांची सुरक्षितता, पूरनियंत्रण, तात्काळ मदत, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी, धरण विसर्ग व पूरस्थितीचा सतत आढावा घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे.
आवश्यकतेनुसार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येणार
सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पूरबाधित व सखल भागांची पाहणी करून संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची नोंद करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या वस्त्या व सखल भागांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येणार आहे. विद्युत विभागामार्फत धोकादायक विद्युत खांब, डीपी बॉक्स, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत उपकरणांची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, पूरस्थितीत तात्पुरती प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक विद्युत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.