

बजरंग मासाळ
पिंपरी: आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या इंद्रायणी नदीची अवस्था मात्र चिंताजनक असल्याचे वास्तव समोर आले आहे. कुदळवाडी, चिखली, देहू आणि आळंदी परिसरात केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत नदीकाठावर कचऱ्याचे ढीग, पाण्यात तरंगणारी जलपर्णी, व्यावसायिकांकडून टाकला जाणारा कचरा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली. वारीपूर्वी नदी स्वच्छतेच्या मोहिमा राबवल्या जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी आहे.
मैलाशुद्धीकरण केंद्रालगतच भंगार
काही भागात मैलाशुद्धीकरण केंद्रांच्या परिसरालगतच भंगार व्यावसायिकांकडून प्लास्टिक, काचा, लोखंडी तुकडे आणि इतर टाकाऊ साहित्य साठवले जात असल्याचे दिसले. काही ठिकाणी हा कचरा थेट नदीत टाकला जात असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. विशेष म्हणजे, नदीप्रदूषण रोखण्यासाठी विविध विभागांकडून बैठका आणि योजना जाहीर होत असताना प्रत्यक्षात नदीपात्रातच कचऱ्याची भर पडत असल्याचे चित्र संतापजनक ठरत आहे.
वारीत लाखो भाविक येणारः पण नदीचे चित्र मात्र विदारक
देहू, आळंदी आणि परिसरातून दरवर्षी लाखो वारकरी पायी जात असतात. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे इंद्रायणी नदीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. अशावेळी नदी परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि कचऱ्याचे ढीग दिसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वारीपूर्वी मोठमोठ्या घोषणा होतात; पण प्रत्यक्षात नदी स्वच्छ कधी होणार असा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करत आहेत.
नदीकाठावर बेवारस बॅरिकेड्स
वाहतूक पोलिसांकडून वापरले जाणारे काही लोखंडी बॅरिकेड्सही नदीकाठावर गंजलेल्या अवस्थेत पडून असल्याचे आढळले. काही ठिकाणी ते कचऱ्याच्या ढिगात मिसळलेले दिसत होते. ही दृश्ये पाहता विविध यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असून, नदी परिसर कोणाचीच जबाबदारी नाही, अशा अवस्थेत सोडल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
जलपर्णी काढली अन् टाकली पुन्हा नदीतच
नदी स्वच्छतेसाठी काही भागांत जलपर्णी काढण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. मात्र, काढलेली जलपर्णीची नदीबाहेर विल्हेवाट न लावता पुन्हा नदीकिनारी किंवा पाण्यातच टाकण्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. यामुळे काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह अडत असून, दुर्गंधी आणि डासांचे प्रमाणही वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
भाविकांच्या श्रद्धेलाच धक्का
कुदळवाडी ते आळंदीदरम्यान अनेक ठिकाणी नदीकाठावर प्लास्टिक, थर्माकोल, काचा, कपडे, पूजेचे साहित्य आणि इतर घनकचऱ्याचे ढीग आढळून आले. काही ठिकाणी स्थानिक व्यावसायिकांचा कचराही थेट नदीपात्रात फेकला जात असल्याचे चित्र दिसले. नदीकाठ स्वच्छ ठेवण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव या पाहणीतून समोर आले.
फोटोपुरत्या मोहिमा की प्रत्यक्ष कृती ?
नदी स्वच्छतेसाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभागांकडून मोहिमा राबवल्या जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत अनेक ठिकाणी परिस्थिती जैसे थे असल्याने या मोहिमा केवळ कागदावर किंवा फोटोपुरत्याच मर्यादित आहेत का, असा सवाल निर्माण होत आहे. नदीपात्रात जाणारे सांडपाणी, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा अभाव आणि अपुरी देखरेख यामुळे इंद्रायणीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगत आहेत.
कागदावर स्वच्छता:
वास्तवात अस्वच्छता जलपर्णी काढली, पण नदीबाहेर नेली नाही
कचरा हटवण्याऐवजी किनाऱ्यावरच ढीग
नदीकाठावरच बेवारस बॅरिकेड्स
व्यावसायिकांचा कचरा थेट नदीत
नागरिकांच्या तक्रारी मात्र कायम
उपाययोजना
नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या व्यावसायिकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करणे
जलपर्णी काढल्यानंतर वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे
नदीकाठांवर सीसीटीव्ही आणि नियमित पथकांची नियुक्ती करणे
मैलाशुद्धीकरण केंद्रांची कार्यक्षमता नियमित तपासणे
अतिक्रमण हटविण्यासाठी संयुक्त मोहीम राबवणे
वारीपूर्वी केवळ दिखाऊ स्वच्छता न करता कायमस्वरूपी नदी संवर्धन आराखडा तयार करणे
नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि वारकरी यांना नदी स्वच्छता मोहिमेत सहभागी करून जनजागृती वाढवणे
इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. नदी व नाल्यांमधील कचरा व प्लास्टिक काढण्यासाठी मेकॅनिकल स्क्रिन बसविण्यात आल्या आहेत. वारीच्या पार्श्वभूमीवर नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू असून, त्यामध्ये सापांचा वावर असल्याने ते काढण्यास काही अडचणी येतात. त्यामुळे ते सुखल्यानंतर काढले जाईल
संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग