Illegal Number Plates Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Modified Silencer Action: कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा हातोडा; ५६८ सायलेन्सरचा रोड रोलरखाली चुराडा!

फेब्रुवारीनंतर पुन्हा मोठी कारवाई; दोन मोहिमांत ९६७ सायलेन्सर नष्ट, २,५६६ नियमबाह्य नंबर प्लेटवरही कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईचा धडाका पाहता दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश करत जाणाऱ्या गाड्यांचा आवाज कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, फेब्रुवारीतील कारवाईनंतर अवघ्या पाच महिन्यानंतर पुन्हा कारवाई करत तब्बल ५६८ सायलेन्सर जप्त करून त्यावरूण रोड रोलर फिरविण्यात आला.

मागील कारवाईच्या तुलनेत यावेळी १६९ सायलेन्सर अधिक आढळल्याने कारवाईचा धाक निर्माण होण्याऐवजी नियमबाह्य सायलेन्सरचा वापर वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दोन मोठ्या कारवायांत आतापर्यंत ९६७ सायलेन्सरचा चुराडा करण्यात आला. तरीही कर्णकर्कश ‘आवाज’ थांबण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांच्या कारवाईचा धाक निर्माण होत नसल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने सर्व वाहतूक विभागांना सोबत घेत नियमबाह्य नंबर प्लेट आणि मॉडिफाइड सायलेन्सरविरोधात संयुक्त मोहीम राबविली. या कारवाईत २,५६६ नियमबाह्य नंबर प्लेट आणि ५६८ मॉडिफाइड सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली. जप्त केलेले सायलेन्सरचा रोड रोलर फिरवून चुराडा करण्यात आला.

आता ‘सायलेन्सर विक्रेत्यां’ वरही नजर

मॉडिफाइड सायलेन्सर बसविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केल्यानंतरही ते पुन्हा बाजारात उपलब्ध होत असतील, तर या उपकरणांचा पुरवठा कुठून होतो, कोण विक्री करतो आणि बाहेरून कोण मागवतो, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. वाहतूक पोलिसांनीही आता याच दिशेने पाऊल टाकले असून बाहेरून मॉडिफाइड सायलेन्सर मागवून विक्री करणाऱ्या डीलर्सची पाहणी करून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. यामुळे आगामी काळातील कारवाई केवळ ‘वाहन पकडले आणि दंड केला’ इतकी मर्यादित न राहता विक्रेता आणि पुरवठादारांपर्यंत पोहोचणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नंबर प्लेटमध्येही नियमांचा ‘खेळ’

सायलेन्सरसोबतच नियमबाह्य नंबर प्लेटविरोधातही पोलिसांनी मोठी मोहीम राबवली. १३ वाहतूक विभागांच्या आकडेवारीनुसार तब्बल २,५६६ नंबर प्लेटवर कारवाई करण्यात आली. नंबर प्लेट हा वाहनाची ओळख दर्शविणारा अत्यंत महत्त्वाचा भाग असताना फॅन्सी, अस्पष्ट किंवा नियमबाह्य प्लेट वापरण्याचा प्रकार अद्याप मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे नागरिकांनी सरकारी नियमांनुसार एचएसआरपी (High Security Registration Plate) नंबर प्लेटच आपल्या वाहनाला बसवावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दंड भरून पुन्हा नियमभंग; आता परवान्यावरही टांगती तलवार

नियमबाह्य सायलेन्सर, नंबर प्लेट, विनाहेल्मेट वाहन चालविणे अथवा इतर वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर केवळ दंडाची कारवाई करून उपयोग होणार नाही. ‘दंड भरला आणि पुन्हा तोच प्रकार’ अशी मानसिकता मोडण्यासाठी वारंवार नियमभंग करणाऱ्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याच्या दिशेनेही वाहतूक पोलिसांकडून पावले उचलली जात आहेत. विशेषतः विनाहेल्मेट आणि वारंवार नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवून पुनरावृत्ती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा मानस आहे.

कारवाईचा धाक पाच महिन्यांत ओसरला?

२७ फेब्रुवारी रोजी वाहतूक विभागांच्या संयुक्त कारवाईत ३९९ मॉडिफाइड सायलेन्सर जमा करून नष्ट करण्यात आले होते. त्यावेळी केलेल्या मोठ्या कारवाईनंतर पुढील काही महिन्यांत अशा प्रकारच्या सायलेन्सरची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र चार महिन्यांतच ५६८ सायलेन्सरवर कारवाई झाल्याने कारवाई होत असतानाही बाजारात नियमबाह्य सायलेन्सरचा पुरवठा सुरूच आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे. मागील ३९९च्या तुलनेत यावेळी ५६८ सायलेन्सर म्हणजे सुमारे ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे केवळ रस्त्यावर वाहनचालकांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसून, या सायलेन्सरच्या निर्मितीपासून विक्रीपर्यंतच्या साखळीवर हातोडा मारण्याची गरज आहे.

दोन कारवायांत ९६७ सायलेन्सरचा ‘आवाज’ बंद!

  • २७ फेब्रुवारी २०२६ - ३९९ सायलेन्सरचा चुराडा

  • २८ ऑगस्ट २०२६ - ५६८ मॉडिफाइड सायलेन्सरवर कारवाई

  • एकूण - ९६७ सायलेन्सर

१३ विभागांची कारवाई

  • २,५६६ - नियमबाह्य नंबर प्लेटवर कारवाई

  • ५६८ - मॉडिफाइड सायलेन्सरवर कारवाई

  • १३ - सहभागी वाहतूक विभाग

  • ३९९ - २७ फेब्रुवारीची मागील कारवाई

  • १६९ - यावेळी वाढलेली सायलेन्सर संख्या

नियमबाह्य सायलेन्सर आणि नंबर प्लेटविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. बाहेरून मॉडिफाइड सायलेन्सर मागवून विक्री करणाऱ्या डीलर्सचीही पाहणी करून कारवाई केली जाणार आहे. वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे लायसन्स निलंबित करण्याच्या दिशेनेही पावले उचलली जात आहेत. नागरिकांनी सरकारी नियमांनुसार HSRP नंबर प्लेटच वापरावी. यावर्षी पुढील मोठी संयुक्त कारवाईही करण्यात येणार आहे.
डॉ. निलेश देशमुख, पोलिस उपअधीक्षक, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT