

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची २० ऑगस्टची सर्वसाधारण तहकूब सभा १७ सप्टेंबरला होणार आहे. मात्र, स्थायी समितीने केलेल्या ठरावानुसार तसेच महापौरांनी दिलेल्या पत्रानुसार सप्टेंबर महिन्यातील मासिक सभा बुधवार (दि. २) घेण्यात आली आहे. मात्र, इतर विषय सभेसमोर घेतले असून, स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषयच सोयीस्करपणे वगळण्यात आला आहे. त्यावरून सत्ताधार्यांकडून राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट होत असून, सभागृहात विरोधक आक्रमक पवित्रा घेऊ शकतात.
वीस ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत शहराशी संबंधित नसलेल्या विषयावर सभा तहकूब करण्याचा निर्णय सत्ताधार्यांनी घेतला. महापौर रवी लांडगे यांची इच्छा नसताना तसेच, आठवड्याभराने सभा घेण्याचा महापौरांचा आग्रह डावलून सभा थेट महिन्याभर म्हणजे १७ सप्टेंबरपर्यत तहकूब करण्यात आली. सत्ताधार्यांच्या या कृतीवर पदाधिकार्यांमध्ये समन्वय नसल्याचे उघड झाले. कोणतेही कारण पुढे करून सभागृहाचे कामकाज रोखले जात आहे. तसेच, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सभागृहात केवळ राजकारण होत असल्याने सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही नाराज आहेत. सभा तहकूबीवरून विरोधकांनी सत्ताधार्यांवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
असे असताना सत्ताधार्यांकडून आता वेगळीच शक्कल लढवण्यात आली आहे. शहराच्या दृष्टीने महत्वाचे असलेले विषय सप्टेंबरच्या महापालिका सभेमध्ये घेण्याचा ठराव स्थायी समितीच्या मंगळवारच्या (दि. २५) सभेत उपसूचनेद्वारे मंजूर करण्यात आला. तसेच, महापौर लांडगे यांनी बुधवार (दि. २) दुपारी दोनला सर्वसाधारण सभा आयोजित करावी. सभेच्या विषयपत्रिकेमध्ये स्थायी समितीचे विषय समाविष्ट करून विषयपत्रिका अंतिम करावी, असे पत्र नगर सचिव विभागास मंगळवारीच दिले आहे.
त्यानुसार नगर सचिव विभागाने तहकूब सभेपुढील विषय घेऊन विषयपत्र तयार केली आहे. तहकूब सभेतील ३१ विषयांपैकी एकूण १८ विषय घेण्यात आले आहेत. तर, विविध कामांसाठी तरतूद वर्गीकरणाचे तीन नवीन विषय आहेत. मात्र, सोईस्कररित्या स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय वगळण्यात आला आहे. त्यावरून सत्ताधार्यांना शहराचे महत्वाचे विषय सोडवायचे नसून, केवळ राजकारण करण्याचे असल्याचा संदेश जात आहे.
‘स्वीकृत’चे घोडे आडले कोठे?
भाजपचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन स्वीकृत नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपकडून तो विषय वारंवार तहकूब करून अखेर, तो विषय १५ जूनला दप्तरी दाखल करण्यात आला. महापौर रवी लांडगे यांनी १२ऑगस्टला पत्र दिल्यानुसार स्वीकृत नगरसेवकांचा विषय ऑगस्टच्या विषयपत्रिकेवर क्रमांक एकवर आला. त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे कारण देत सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे व भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी हात वर केले आहेत. त्या विषयामुळेच ती सभा तहकूब करण्यात आल्याने खासगीत सांगितले जात आहे. त्या कारणांमुळेच सप्टेंबरच्या सभेच्या विषयपत्रिकेवरून तो विषय घेतला गेलेला नाही. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांचे घोडे नेमके कोठे आडले आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सात दिवसांचा नियम न पाळताच सभेचे आयोजन
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार तहकूब सभेव्यतिरिक्त अन्य प्रत्येक सभेची सर्वसाधारणपणे निदान सात पूर्ण दिवसांची नोटीस दिली पाहिजे, असा नियम आहे. सप्टेंबरच्या सभेची नोटीस गुरूवारी (दि. २७) काढण्यात आली आहे. त्यामुळे सात दिवस पूर्ण न होताच बुधवार (दि. २) सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ती सभा नियमानुसार अधिकृत ठरू शकत नाही, असा दावा केला जात आहे.
केवळ चार विषयाचा ठराव असताना तब्बल २१ विषय
स्थायी समितीच्या मंगळवारी (दि. २५) झालेल्या सभेत उपसूचना देऊन एक ठराव करण्यात आला. त्यानुसार ई-आरटीएस वाहतूक व्यवस्था, पार्किंग धोरण, मेट्रो मार्गिकाबाबत आणि सार्वजनिक शौचालय हे विषय शहराच्या दृष्टीने अंत्यत महत्वाचे असल्याने ते विषय सप्टेंबर २०२६ च्या महापालिका सभेमध्ये घेण्यात यावेत, असा तो ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, सप्टेंबरच्या सभेसमोर त्या चार विषयांसह इतरही अनेक विषयांचा समावेश करण्यात आला. एकूण २१ विषय सभेसमोर ठेवण्यात आले आहेत.
तहकूब सभेचे विषय नियमित सभेत घेण्याबाबत स्पष्टता नाही
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार तहकूब सभेतील विषय नियमित मासिक सर्वसाधारण सभेत घेण्याबाबत स्पष्ट असे निर्देश व नियम नाहीत. त्या आधारे सत्ताधार्यांनी १७ सप्टेंबरच्या तहकूब सभेतील १८ विषय २ सप्टेंबरच्या सभेसाठी घेतल्याचा दावा केला जात आहे.
सप्टेंबरच्या सभेत एकही नवीन विषय नाही
महापालिकेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी दर महिन्यास एक सर्वसाधारण सभा घेतली जाते. त्यामुळे महापालिकेचे म्हणजेचे नागरिकांचे कामे वेळेच्या वेळी मार्गी लागतात. ऑगस्ट महिन्याची सभा तहकूब झाल्याने ती सभा १७ सप्टेंबरला होत आहे. मात्र, सप्टेंबरच्या नियमित सर्वसाधारण सभेत तहकूब सभेचे म्हणजे ऑगस्टचे विषय घेण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन एकही विषय सभेसमोर आलेला नाही. परिणामी, विकासकामांना ब्रेक लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापौरांच्या पत्रानुसार सभेचे आयोजन
स्थायी समितीने केलेला ठरावानुसार तसेच, महापौर रवी लांडगे यांनी दिलेल्या पत्रानुसार बुधवारी (दि. २) सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. त्यानुसार विषयपत्रिका गुरुवारी (दि. २७) तयार करून महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे महापालिकेचे नगर सचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.