Minor Driving Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Minor Road Accidents: पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीनांच्या हातात दुचाकी जीवघेणी; ३२ महिन्यांत ५५ जणांचा अपघाती मृत्यू

पालकांनी वाहनाची चावी देणे ठरतेय जीवावर बेतणारे; वेग, स्टंट, हेल्मेटचा अभाव आणि सोशल मीडियाचा नाद ठरतोय धोकादायक

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: 'दूध घेऊन ये', 'क्लासला जाऊन ये', 'जवळच तर जायचे आहे', असे म्हणत घरातील दुचाकीची चावी अल्पवयीनांच्या हातात देणे किंवा ते दुचाकी घेऊन फिरत असल्याकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरत आहे. जानेवारी २०२४ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत १८ वर्षांखालील तब्बल ५५ अल्पवयीनांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. वाढती आकडेवारी पालकांसह पोलिसांचीही चिंता वाढवणारी ठरत आहे.

सन २०२४ मध्ये १३, सन २०२५ मध्ये २५, तर चालू वर्षात ऑगस्टपर्यंत १७ अल्पवयीनांना अपघातात जीव गमवावा लागल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. अपघातांच्या तपासात अनेकदा पालकांनीच अल्पवयीनांच्या हातात दुचाकी दिल्याचे किंवा ते घरातील अथवा मित्रांची दुचाकी वापरत असल्याची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अल्पवयीनांच्या वाहन वापराबाबत पालकांची जबाबदारी पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

वाहन चालविण्याचा अपुरा अनुभव, वेगावर नियंत्रण न राहणे, वाहतूक नियमांची अपुरी माहिती, हेल्मेटचा अभाव आणि मित्रांसमोर वेग दाखविण्याची स्पर्धा यामुळे क्षणभरातील चूक जीवावर बेतत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. अपघातानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा अल्पवयीनांच्या हातात वाहनाची चावीच जाऊ न देणे ही सर्वांत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्याचे वाहतूक पोलिस सांगतात.

सोळा वर्षे झाली म्हणजे सरसकट मुभा नाही

मोटार वाहन कायद्याच्या कलम ४ नुसार १८ वर्षांखालील व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालविता येत नाही. केवळ १६ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीस ५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेचे इंजिन नसलेली मोटारसायकल चालविण्याची मर्यादित तरतूद आहे. त्यामुळे १६ किंवा १७ वर्षांच्या अल्पवयीनाला घरातील सर्वसाधारण स्कूटर अथवा मोटारसायकल चालविण्यास देणे कायदेशीर ठरत नाही. सध्या वापरात असलेल्या बहुतांश स्कूटर आणि मोटारसायकली ५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या असल्याने वयाची १६ वर्षे पूर्ण झाली म्हणजे कोणतीही दुचाकी चालविण्याची मुभा मिळते, हा गैरसमज पालकांनी दूर करणे आवश्यक असल्याचे कायदेतज्ज्ञ सांगतात.

रील्सच्या नादात 'स्टंट'

सोशल मीडियावर वेग आणि स्टंटचे व्हिडिओ करण्याच्या नादात धोकादायक वाहन चालवणे जीवघेणी ठरू शकते. मित्रांसमोर भरधाव दुचाकी चालविणे, एका दुचाकीवर तिघांनी बसणे, हेल्मेट न वापरणे तसेच धोकादायक स्टंट करणे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. त्यामुळे पालकांनी केवळ घरातील वाहनाच्या चावीकडेच नव्हे, तर पाल्यांच्या सोशल मीडिया वापराकडेही लक्ष ठेवण्याची गरज आहे. दुचाकीसह स्टंटचे व्हिडिओ किंवा भरधाव वाहन चालवितानाचे व्हिडिओ निदर्शनास आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच समज देणे आवश्यक आहे.

'बीएनएस'मध्येही कारवाईची तरतूद

अल्पवयीन चालकाने सार्वजनिक रस्त्यावर बेदरकार किंवा निष्काळजीपणे वाहन चालवून इतरांच्या जीविताला धोका निर्माण केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार कारवाई होऊ शकते. निष्काळजी किंवा बेदरकार कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रकरणातील परिस्थिती आणि पुराव्यांनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम अंतर्गतही कारवाईची तरतूद आहे. अल्पवयीन चालक असल्यामुळे त्याच्यावरील पुढील कार्यवाही बाल न्याय कायद्यातील तरतुदींनुसार केली जाते. मात्र, अल्पवयीन असल्यामुळे पालक अथवा वाहनमालक जबाबदारीतून आपोआप मुक्त होत नाहीत. त्यांची स्वतंत्र जबाबदारी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार निश्चित होऊ शकते.

पोर्शे प्रकरणानंतरही धडा नाही

पुण्यातील कल्याणीनगर येथे १९ मे २०२४ रोजी झालेल्या पोर्शे कार अपघाताने अल्पवयीन वाहनचालकांचा प्रश्न देशभर चर्चेत आला. अल्पवयीन चालकाच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अल्पवयीनांच्या हातात वाहनाची चावी देण्याचे गंभीर परिणाम आणि त्यासाठी पालकांची असलेली कायदेशीर जबाबदारी अधोरेखित झाली. मात्र, त्यानंतरही कमी वयात वाहन चालविण्याचे प्रकार थांबलेले नसल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे. त्यामुळे पोर्शेसारख्या गंभीर घटनेनंतरही अनेक पालकांनी धडा घेतलेला नसल्याचे चित्र आहे.

मुलांच्या चुकीची किंमत पालकांनाही

अल्पवयीनाकडून मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा घडल्यास पालक किंवा वाहनमालकावरही जबाबदारी निश्चित होऊ शकते. मोटार वाहन कायद्याच्या कलमानुसार, वाहन आपल्या माहितीशिवाय वापरण्यात आले किंवा ते रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली होती, हे संबंधित पालक अथवा वाहनमालकाला सिद्ध करावे लागू शकते. त्यामुळे अल्पवयीनाला वाहन देणे केवळ वाहतूक नियमभंगापुरते मर्यादित राहत नाही. दोष सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. संबंधित वाहनाची नोंदणी १२ महिन्यांसाठी रद्द केली जाऊ शकते. तसेच, संबंधित अल्पवयीनाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत शिकाऊ किंवा नियमित वाहन परवाना मिळण्यास अपात्र ठरविले जाऊ शकते. त्यामुळे अल्पवयीनाच्या हातात वाहन देण्यापूर्वी पालकांनी त्याचे कायदेशीर परिणामही लक्षात घेण्याची गरज आहे.

अल्पवयीनांच्या हातात वाहन देणे हा केवळ वाहतूक नियमांचा भंग नाही, तर त्यांच्या जीवाशी खेळ आहे. अल्पवयीनाने वाहन चालविताना गुन्हा केल्यास पालक किंवा वाहनमालकावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. पालकांनी त्यांना दुचाकी देऊ नये तसेच ते मित्रांची किंवा इतरांची वाहने चालवत नाहीत ना, यावरही लक्ष ठेवावे. अपघातानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.
विक्रांत देशमुख, पोलिस उपायुुक्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT