Mini Compactor Waste Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Mini Compactor Waste Issue: पिंपळे निलख, पिंपळे सौदागर परिसरात मिनी कॉम्पेक्टरमुळे कचऱ्याचा गोंधळ

कचरा संकलनाऐवजी रस्त्यावर सांडणारा कचरा; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे निलख: महापालिकेने व्यावसायिक परिसर व गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा संकलन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपळे निलख, पिंपळे सौदागर आणि सांगवी परिसरात मिनी कॉम्पेक्टर गाड्या नेमल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात या गाड्यांमुळे कचरा संकलनाऐवजी परिसरात अस्ताव्यस्त कचरा पसरण्याचे चित्र दिसून येत आहे. ओला, सुका तसेच घातक कचरा एकाच डस्टबिनमधून आणि नंतर कचरा गाडीतून वाहिला जात असल्याने कचरा वर्गीकरणाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र उपनगरांत दिसून येत आहे.

पिंपळे निलख, पिंपळे सौदागर आणि सांगवी परिसरात कचरा संकलन करण्यासाठी मिनी कॉम्पेक्टर गाड्या येत आहेत. मात्र, त्यातील बिन लिफ्टर यंत्रणा वारंवार निकामी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, कचरा उचलताना तो योग्यरित्या कॉम्पेक्टरमध्ये न जाता रस्त्यावर सांडत आहे. यानंतर आरोग्य कर्मचारी तो कचरा उचलण्याऐवजी तसेच सोडून निघून जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. विशेष म्हणजे बिन लिफ्टरद्वारे कचरा उचलताना अनेक बिन अडकून तुटत आहेत. काही कुंड्या वाकड्या होऊन खराब होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे दुसर्ऱ्या दिवशी कचरा टाकतानादेखील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत चालक व कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी लिफ्टरमध्ये कधी कधी प्लास्टिक अडकून बिघाड होतो असे सांगितले. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हा बिघाड वेळेत दुरुस्त न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

घंटागाडीची पहावी लागतेय वाट

उपनगरांमध्ये कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या गाड्या दिलेल्या वेळेत येत नसल्याने सोसायटीतील सफाई कर्मचारी कचऱ्याचे डस्टबिन सोसायटीच्या प्रवेशद्वारावर आणून ठेवतात. गाडी ठरलेल्या वेळेत येत नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच स्थानिक व्यावसायिक व रहिवासी नागरिकांमध्ये तीव नाराजी निर्माण झाली आहे. स्वच्छतेसाठी नेमलेल्या मिनी कॉम्पेक्टरमुळेच परिसरात दुर्गंधी, माशा आणि रोगराईचे संकट वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने कचरा संकलन करण्यासाठी मिनी कॉम्पेक्टर नेमले आहेत. पण ती गाडी येते आणि कचरा उचलण्याऐवजी रस्त्यावर पसरवून जाते. मशीनद्वारे बिन उचलताना बिन मोडते व नेमका कचरा उचलते की कचराकुंड्या कुचलते तेच समजत नाही. यावर नियोजनबद्ध उपाय करणे गरजेचे आहे.
मनोज किवळे, सोसायटी चेयरमन
कचरा संकलनाबाबत नागरिकांच्या तक्रारी असतील तर आम्ही तात्काळ पाहणी करतो. काही किरकोळ बिघाड असल्यास तो दुरुस्त करून घेतो. तसेच यापुढे कचरा रस्त्यात सांडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल
एम. किशोर,घंटा गाडी देखभाल विभाग, ह क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT