पिंपरी: गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक पावले उचलली आहेत. सद्याःस्थितीत शहरातील अंदाजे दोन हजार केटरर्स असताना केवळ २१५ जणांनी महाप्रसाद बनवण्यासाठी अधिकृत नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे उत्सव काळात हजारो भाविकांना वाटप केल्या जाणाऱ्या महाप्रसादाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. या पार्श्वभूमीवर महाप्रसाद तयार करणाऱ्या केटरर्सकडून अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन होते की नाही, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध व्हावी, यासाठी प्रकिया राबविण्यात आली होती. सद्यस्थितीत शहरातील अंदाजे दोन हजार केटरर्स किंवा स्वयंपाकी असताना केवळ २१५ जणांनी महाप्रसाद बनवण्यासाठी अधिकृत नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयाच्या हद्दीत २ हजार ३५२ आणि पिंपरी-चिंचवड शहरात १ हजार ५०० तर महापालिकेकडे २५१ गणेशोत्सव मंडळाची नोंद आहे. यंदाच्या उत्सवात मंडळांना महाप्रसाद पुरविणाऱ्या सर्व केटरर्सकडे एफएसएसआयचा वैध परवाना बंधनकारक आहे. असे असतानाही हजारो छोटे केटरर्स व मोदक आणि प्रसाद तयार बनविणारे व्यावसायिक या प्रकियेपासून दूर आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट अन्न जप्ती आणि दंडात्मक कारवाईचा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.
महाप्रसादाचे किंवा अन्नदानाच्या आयोजनासाठी पूर्वनोंदणी आणि अधिकृत परवाना बंधनकारक आहे. शहरात लहान मोठी हजारों मंडळे आहेत. केटरर्सच्या नोंदणीचे प्रमाण पाहता एवढ्या मोठ्या शहरात उत्सव काळात होणारे मोफत अन्न पदार्थ वाटप नेमके किती सुरक्षित असणार, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मंडळांनी सर्तक रहावे
केटरर्सच्या अल्प प्रतिसादामुळे मंडळांनीही अन्नदान आयोजित करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही अनधिकृत किंवा विनापरवाना केटरर्सकडून महाप्रसाद बनवून घेतल्यास संबंधित मंडळालाही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. प्रशासनाने मंडळाना केवळ वैध एफएसएसआय नोंदणी असलेल्या केटरर्सचीच निवड करण्याचे आवाहन केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे प्रामुख्याने गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करून अन्नदान करतात. याशिवाय, काही मोठी मंडळे माघी गणेशोत्सव, अंगारकीला अन्नदान करतात. काही मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवातील सातव्या दिवशी या पारंपरिक अन्नदानाचे आयोजन केले जाते.
अन्न पदार्थांची तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. अन्न पदार्थ तयार करताना अस्वच्छता आढळल्यास किंवा परवान्याशिवाय महाप्रसाद तयार केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.संजय चट्टे, सहायक आयुक्त, अन्न औषध प्रशासन