पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याच्या शेवटपर्यंत प्रतीक्षेत ठेवले. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून एबी फॉर्म वाटपाबाबत खेळखंडोबा झाल्याचे दिसून आले. भाजपाकडून यादीसाठी रविवारची डेडलाईन देवूनही उमेदवारी निश्चित होण्यासाठी मंगळवार दुपारी तीनपर्यंत बाहेरच आली नाही.
निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आधीच सावध भूमिका घेण्यात आली होती. 32 प्रभागातील 128 उमेदवारांसाठी जवळपास 730 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या होत्या. तर, 50 हून अधिक आयारामांचा प्रवेश घडवून आणला होता. त्यातच पक्षातील बंडाळी टाळण्यासाठी पक्षाकडून आधीच माघारीचा अर्ज घेतल्याची चर्चा होती. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस शिल्लक असताना पक्षाकडून यादी अथवा एबी फॉर्मची माहिती घोषित करण्यात आली नव्हती. तीच री ओढत अन्य पक्षाने म्हणजेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह अन्य पक्षाने देखील यादी लपवली किंबहुना ती आधीच ताणून ठेवण्यात आली आहे.
युतीचे गणित फिस्कटल्याने भाजपाकडून काथ्याकुटीत पक्षातील इच्छुकांना दिवसभर प्रतीक्षेत ठेवले. बंडखोरी टाळण्यासाठी वेगवेगळे तर्क लढविले गेले. त्याचच एक भाग म्हणून ही यादी शेवटच्या दिवसापर्यंत अगदी शेवटच्या मिनीटापर्यंत बाहेरच येवू दिली नाही. त्यामुळे पक्षातील इच्छुकांची घालमेल सुरु होती. दरम्यान, मंगळवारी दुपारी वाट पाहल्यानंतर अनेकांनी इतर पक्षांशी बोलणी सुरु केली. तसेच, काहींना खिशात ए बी फॉर्म देखील घेऊन ऐनवळी तो दाखल केल्याचे बोलले जाते..
ऐनवेळी पक्षात फाटाफूट
पक्षातील नाराजांनी ऐनवेळी अन्य पक्षात प्रवेश केला आहे. शेवटपर्यंत पक्षाने एबी फॉर्म न दिल्याने अखेर अनेक इच्छुकांनी राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट असे पर्याय जवळ केले. त्यापैकी राष्ट्रवादीत जाण्यामध्ये सर्वाधिक चढाओढ दिसून आली. 15 हून अधिक माजी नगरसेवकांचा पत्ता कट झाला तर, काहींनी अन्य पक्षात प्रवेश केल्याने त्याऐवजी अन्य उमेदवार शोधावा लागला.
राष्ट्रवादीचे गणित उलगडेना
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी अर्थात अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही एकत्र लढण्याची घोषणा केली होती. पण, शहरात काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीकडून एकाच प्रभागात पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याने या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांची गल्लत झाली. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे मातब्बर असलेल्या ठिकाणी ती उमेदवारी दिली आहे.