Arrested Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Car Reels: रस्त्यावर आलिशान गाड्या उभ्या करून ‘रील्स’; पोलिस आयुक्त संतापले, तिघांना अटक

उत्तर महाळुंगे एमआयडीसीतील प्रकार; वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा, फॉर्च्युनरसह चार वाहने ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: आलिशान गाड्या रस्त्यावर उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत रील्स बनवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. व्हिडीओ पाहून संतप्त झालेल्या पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांना फोन केला, 'रस्त्यावर माज करणारे कोणीही असू द्या, त्यांची गय करू नका. त्यांना उचलून आणा,' अशा शब्दांत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांची सर्व यंत्रणा कामाला लागली. चौघांविरोधात गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच, फॉर्च्यूनरसह चार वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संत तुकाराम चौक ते मिंडेवाडी रस्त्यावर गुरुवारी (दि. ३) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा प्रकार घडला. राम हिरामण राऊत (रा. भांबोली, ता. खेड), साहिल बारकू जांभळे (रा. वासुली, ता. खेड) आणि आदित्य कैलास निखाडे (रा. भांबोली, ता. खेड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्यासह प्रणव मालक पाचपुते (रा. वासुली, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाळुंगे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावर चार वाहने रस्त्याच्या मधोमध उभी करण्यात आली होती. मागून येणाऱ्या वाहनांचा मार्ग अडवत संबंधितांनी वाहने एकमेकांना समांतर चालवली. तसेच गाड्यांचा वेग कमी-जास्त करत या प्रकाराचे कॅमेरा आणि ड्रोनच्या सहाय्याने चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी उपायुक्त श्वेता खेडकर यांना फोन करून संबंधितांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करून अशा प्रकारे रील्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

त्यानंतर उपायुक्त खेडकर यांनी स्थानिक पोलिसांना संबंधित आरोपी आणि वाहनांचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले. पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच बातमीदारांच्या मदतीने संबंधितांची आणि वाहनांची ओळख पटवली. त्यानंतर राम राऊत, साहिल जांभळे आणि आदित्य निखाडे या तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी फॉर्च्युनर (एमएच १४/एनएन ०००५), स्कॉर्पिओ (एमएच १४/ईसी १६५८), स्विफ्ट (एमएच १४/एचडब्ल्यू ४७०८) आणि फ्राँक्स (एमएच १४/एलएल २५२०) ही चार वाहने ताब्यात घेतली आहेत.

महामार्गावरही रील्स

काही दिवसांपूर्वी मुंबई-बंगळुरू महामार्गावरही नवीन आलिशान गाड्या रस्त्यावर उभ्या करून रील्सचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यामुळे बाणेर, भुजबळ चौक आणि वाकड परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्याप्रकरणी बावधन पोलिसांनी कारमालक, फोटोग्राफर आणि चालकांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर उत्तर महाळुंगे एमआयडीसी परिसरात पुन्हा तसाच प्रकार समोर आल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

महाळुंगे एमआयडीसीमधील रस्त्यांवर काढलेला व्हिडीओ समोर येताच त्याची गांभीर्याने दखल घेत संबंधितांचा शोध घेण्यात आला. वाहतुकीस अडथळा करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
श्वेता खेडकर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT