पिंपरी: इराण-अमेरिका, इस्त्रायल यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गॅस इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याची झळ आता पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यावसायिकांना बसू लागली आहे. शहरात एलपीजी गॅसचा अपुरा व विस्कळीत पुरवठा होत असल्याने हॉटेल, उपाहारगृहे; तसेच खाद्य पदार्थ बनविणारे छोटे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध न झाल्यास ग््रााहकांची ऑर्डर कशी पूर्ण करायची, अशा चिंतेने शहरातील हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. हॉटेल व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर गॅसवर अवलंबून आहे. स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरची गरज असते. मात्र युद्ध सुरु झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचा पुरवठा उशिरा होत असल्याने व्यवसाय सुरळीत चालवणे कठीण झाले आहे.
व्यावसायिकांची समस्या:
अनेक हॉटेलचालकांना दररोज लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा वेळेवर होत नाही. सिलिंडर मिळण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे हॉटेलचे कामकाज विस्कळीत होत असून ग््रााहकांना सेवा देणे कठीण होत आहे.
पर्यायही मर्यादित:
हॉटेल व्यावसायिकांकडे गॅसच्या पर्याय म्हणून फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. तंदूरसाठी कोळसा वापरण्यावर अनेक ठिकाणी निर्बंध असल्याने तो वापरणे शक्य होत नाही. दुसरीकडे इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करायचा म्हटल्यास उन्हाळ्यात विजेचा पुरवठादेखील वारंवार खंडित होत असल्याने त्या पर्यायावरही पूर्णपणे अवलंबून राहणे शक्य नाही. यामुळे गॅसचा अपुरा पुरवठा हा व्यावसायिकांसाठी मोठे संकट ठरत आहे. अनेक छोटे हॉटेल चालक सांगतात की, गॅस सिलेंडर वेळेवर न मिळाल्यास दिवसभराचा व्यवसाय ठप्प होतो. ग््रााहकांना परत पाठवावे लागते आणि त्यामुळे आर्थिक नुकसानही सहन करावे लागते.
एमएनजीएल कनेक्शन असलेल्या हॉटेलांना दिलासा:
शहरात काही हॉटेलना एमएनजीएलकडून पाइपद्वारे गॅस पुरवठा केला जातो. अशा हॉटेलचा व्यवसाय सध्या तुलनेने सुरळीत सुरू आहे. मात्र, बहुसंख्य लहान व मध्यम हॉटेल अजूनही एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. त्यामुळे एमएनजीएल कनेक्शन असलेली हॉटेल सुरू आहेत, पण इतरांचे काय, असा प्रश्न हॉटेलचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
उपाययोजनांची अपेक्षा:
हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. गॅसचा पुरवठा नियमित व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्यासच व्यवसाय सुरळीत राहील, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, युद्धाची परिस्थिती दीर्घकाळ राहिल्यास शहरातील लहान हॉटेल, खाणावळी खाद्य पदार्थ बनविणाऱ्या छोट्या व्यावसांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे व्यवसाय बंद होण्याच्या स्थितीत आहे. आणखी काही दिवस हीच परिस्थिती राहिल्यास हॉटेल बंद ठेवावे लागतील. कोळसा वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आम्हांला त्याचा वापर करता येत नाही.गणेश कुदळे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड रेस्टॉरंट