राहुल हातोले
पिंपरी: औद्योगिक नगरी म्हणून देशभरात ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कामगारांची कमतरता जाणवत आहे. कंपन्या, बांधकाम व्यवसाय, सुतारकाम, वाहतूक आदी कामांमध्ये मजुरांची उणीव निर्माण झाल्याने अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. एप्रिल-मे महिन्यात गावाकडे गेलेले परप्रांतीय मजूर अद्याप शहरात परतले नसल्याने उद्योगांची चाके मंदावली आहेत.
एक किंवा दोनच शिफ्टमध्ये काम सुरू
कामगारांच्या कमतरतेचा सर्वाधिक फटका लघुउद्योगांना बसत आहे. अनेक उद्योग पूर्वी तीन शिफ्टमध्ये सुरू असत. मात्र, आता मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने दोन शिफ्टमध्येच कामकाज सुरू ठेवावे लागत आहे. काही उद्योगांमध्ये तर मालक स्वतः मशीनवर काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुप्पट मजुरी देऊनही मजूर मिळेनात
सुतारकाम, मालवाहतूक, गोडाऊनमधील ओझी उचलण्याची कामे, कंपनीतील सहाय्यक कामे यांसाठी सध्या मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज आहे. अनेक ठिकाणी नेहमीच्या रोजंदारीपेक्षा दुप्पट वेतन देण्याची तयारी दाखवूनही कामगार मिळत नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
बरेच उद्योग स्थलांतरितांवर अवलंबून
शहरातील बऱ्याच उद्योगांमध्ये बिगारी आणि मजुरांची संख्या अधिक आहे. मेहनतीची कामे असल्याने या कामांमध्ये स्थानिक तरुणांची संख्या कमी आहे. परिणामी स्थलांरितांवर या कामाची जबाबदारी असल्याने त्यांच्या अनुपस्थिती ही कामे खोळंबली आहेत.
लग्नसराई, शेतीकामांमुळे मुक्काम वाढला
दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल आणि मे महिन्यातील लग्नसराईसाठी तसेच शेतीच्या कामांसाठी हजारो मजूर आपल्या मूळ गावी गेले आहेत. मात्र, यावर्षी गॅसची टंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि वाढती महागाई यामुळे अनेकांनी शहरात परतण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. जूनअखेरपर्यंतही परत येण्याची शक्यता कमी असल्याने शहरातील व्यावसायिक आणि उद्योजक चिंतेत सापडले आहेत.
दोन ते अडीच लाख मजुरांवर शहराचा भार
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्रांमध्ये अंदाजे दोन ते अडीच लाख कामगार कार्यरत आहेत. कंपन्यांमधील हेल्पर, पॅकिंग कर्मचारी, सुतार, रंगारी, वेल्डर तसेच बांधकाम मजूर अशा अनेक क्षेत्रांमध्ये स्थलांतरित कामगारांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. मेहनतीची आणि शारीरिक कष्टाची कामे असल्याने स्थानिक तरुणांचा या क्षेत्रांकडे कल कमी असल्याचे दिसून येते.
उद्योगांसमोर नवे आव्हान
औद्योगिक विकासाच्या वेगासाठी ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरासमोर आता कुशल आणि अकुशल मजुरांची कमतरता हे मोठे आव्हान बनले आहे. स्थलांतरित मजुरांवर असलेले वाढते अवलंबित्व आणि स्थानिक स्तरावर मनुष्यबळाची कमतरता यामुळे उद्योगक्षेत्र चिंतेत आहे. आगामी काळात परिस्थिती सुधारली नाही. तर, उत्पादन क्षमता आणि उद्योगांच्या आर्थिक चक्रावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कामगार मिळत नसल्याने ऑर्डर वेळेत पूर्ण करणे कठीण झाले आहे. काही वेळा मालकांनाच कारखान्यात उतरून काम करावे लागत आहे. दुप्पट दाम देवूनही मजूर उपलब्ध होत नाहीत.अभय भोर, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोशिएशन