Liquor Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Illegal Liquor Case: पिंपरी-चिंचवडमध्ये हातभट्टी दारूचे जाळे कायम; हजारो कारवाया निष्फळ

8 हजारांहून अधिक गुन्हे, 8,600 हून अधिक अटक तरीही अवैध दारू व्यवसाय सुरूच; पोलिसांसमोर मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: हातभट्टी आणि गावठी दारूच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी मागील सहा वर्षांत हजारो कारवाया केल्या आहेत. दरम्यान, हजारो आरोपींना अटक करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, या सर्व कारवायांनंतरही हातभट्टीचा व्यवसाय बंद होण्याऐवजी नव्या ठिकाणी, नव्या पद्धतीने सुरूच असल्याचे वास्तव समोर आले आहे. भट्‌‍ट्या उद्ध्वस्त करणे, आरोपींना अटक करणे आणि गुन्हे दाखल करणे या कारवायांनंतरही अनेकजण पुन्हा त्याच व्यवसायाकडे वळत असल्याने हातभट्टीविरोधातील लढ्यात पोलिस यंत्रणाही हतबल ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

अवैध दारूचे जाळे मोडून काढण्यात यंत्रणेला अपयश

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 2021 ते 2026 या कालावधीत हातभट्टी व गावठी दारूविरोधात 8 हजार 277 गुन्हे दाखल केले. या कारवायांमध्ये 8 हजार 615 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच तब्बल 24 कोटी 29 लाख 34 हजार 477 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, एवढ्या मोठ्या कारवाईनंतरही अवैध दारूचे जाळे पूर्णपणे मोडून काढण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. पोलिस कारवाईची तीवता वाढताच अवैध दारू व्यावसायिकांनीही आपली कार्यपद्धती बदलली आहे. शहरातील उघड भागांऐवजी जंगल, डोंगरकपारी, नदी-नाले, ओढ्यांच्या काठावरील दुर्गम भाग आणि आडरानातील ठिकाणी भट्‌‍ट्या उभारल्या जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. एका ठिकाणी कारवाई करून भट्टी उद्ध्‌‍वस्त केली की काही दिवसांतच दुसऱ्या भागात पुन्हा उत्पादन सुरू होत असल्याचेही आढळून आले आहे.

महिलांचाही सहभाग

हातभट्टी व्यवसायात महिलांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी महिलांना पुढे करून विक्री केली जाते. त्यामुळे कारवाई करताना सामाजिक आणि कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते. काही भागांत कुटुंबातील सर्व सदस्यच या व्यवसायात सहभागी असल्याची उदाहरणेही समोर आली आहेत.

परप्रांतीय मजूर व्यसनाधीन

शहरातील बांधकाम प्रकल्पांवरील कामगार, परप्रांतीय मजूर, छोट्या उद्योगांतील कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि झोपडपट्टी भागातील नागरिक हे हातभट्टी व्यावसायिकांचे प्रमुख लक्ष्य बनले आहेत. कमी किमतीत सहज उपलब्ध होणारी दारू आणि व्यसनाधीन ग््रााहकवर्ग यामुळे या व्यवसायाला सातत्याने मागणी मिळते. शहराच्या बाहेरील बांधकाम साईट, औद्योगिक वसाहतीलगतच्या वस्त्या आणि झोपडपट्‌‍ट्यांमध्ये हातभट्टीची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

कारवाईनंतरही पुन्हा व्यवसाय उभा

यातील विशेष बाब म्हणजे, अटक झालेल्या अनेक आरोपींची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच किंवा जामिनावर सुटका झाल्यानंतर ते पुन्हा त्याच व्यवसायात परतल्याची अनेक उदाहरणे पोलिसांच्या नोंदीत आहेत. त्यामुळे केवळ अटक आणि गुन्हे दाखल करून हा व्यवसाय पूर्णपणे बंद करणे कठीण ठरत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हातभट्टी व्यवसायाशी संबंधित अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून असल्याने कारवाईनंतरही हा व्यवसाय पुन्हा उभा राहत असल्याचे दिसून येते. मागील सहा वर्षांच्या आकडेवारीकडे पाहिल्यास 2024 आणि 2025 या दोन वर्षांत सर्वाधिक कारवाई झाल्याचे दिसते. 2024 मध्ये 2 हजार 76, तर 2025 मध्ये 2 हजार 168 गुन्ह्यांची नोंद झाली. या दोन वर्षांतच चार हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यावरून अवैध दारू व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे, याचा अंदाज येतो. कारवाया वाढल्या म्हणजे व्यवसाय कमी झाला असे नाही, तर तो अधिक व्यापक स्वरूपात सुरू असल्याचेच या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

हातभट्टी व्यवसाय सामाजिक प्रश्न

हातभट्टीची दारू आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. विषबाधा, अंधत्व, मृत्यू, कौटुंबिक हिंसाचार, गुन्हेगारी आणि सामाजिक समस्या वाढविण्यात या व्यवसायाचा मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तरीही आर्थिक फायद्यासाठी आणि स्वस्त दारूच्या मागणीमुळे हा व्यवसाय सुरूच आहे. अलीकडील विषारी दारू प्रकरणांमुळे या समस्येचे गांभीर्य पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे हातभट्टीचा प्रश्न हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा नसून सामाजिक प्रश्न असल्याचे स्पष्ट होत आहे.

हातभट्टीच्या व्यवसायामध्ये अनेक दशकांपासून काही ठराविक समाज कार्यरत आहे. शिक्षणाचा अभाव, आर्थिक परिस्थिती आणि जनजागृतीचा अभाव यामुळे अनेक कुटुंबे वर्षांनुवर्षे हा व्यवसाय करीत आहेत. महिलांना पुढे करून छुप्या पद्धतीने व्यवसाय चालविला जातो. पोलिस कारवाईनंतर आरोपींना अटक होते. मात्र, कायद्यातील शिक्षेचे प्रमाण कमी असल्याने त्यांची लवकर सुटका होते आणि ते पुन्हा त्याच व्यवसायाकडे वळतात. इतर व्यवसायातून एवढे उत्पन्न मिळणार नाही, अशी त्यांची मानसिकता असते. त्यामुळे कारवाईसोबत समुपदेशन आणि पर्यायी उपजीविकेची आवश्यकता आहे.
रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT