अतिक्रमणांवर कारवाई pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Encroachments: पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाई करा: आयुक्त

महापालिका आयुक्तांचा संबंधित अधिकार्‍यांना आदेश

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांची संख्या वाढली आहे. त्यावर तातडीने कारवाई करा. पदपथावर अतिक्रमण होणार नाही, यासाठी पथकांची नियुक्ती करा. कारवाईमध्ये सातत्य ठेवा. अन्यथा निलंबनाची कारवाई केली जाईल, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणविरोधी मोहिमेचा आढावा आयुक्तांनी घेतला. बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, अमित पंडित, अतुल पाटील, निवेदिता घार्गे, प्रशासन अधिकारी किशोर ननवरे, कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, विजय सोनवणे, प्रभारी कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते, उपअभियंता किरण माने आदी उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, सध्या शहरात सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. नियमातील तरतुदीनुसार अशा बांधकामांवर कारवाई करण्यापूर्वी 24 तास अगोदर नोटीस द्या. शहरातील रस्त्यालगतच्या पदपथावर होणारे अतिक्रमण काढण्यात यावे. सर्व क्षेत्रीय अधिकारी व बीट निरीक्षकांनी सतर्क राहावे. कारवाईमध्ये टाळाटाळ करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल.

शहरातील कोणत्या प्रभागात अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामाची समस्या जास्त आहे, ही समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना सुरू आहेत, यावर चर्चा करण्यात आली. अनधिकृत बांधकामे, पदपथ व नाल्यावर झालेले अतिक्रमण, परवानगीविना सुरू असलेल्या आठवडे बाजार याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले की, अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासोबतच अशा प्रकारची बांधकामे होणार नाहीत, यासाठी विशेष काळजी घ्यावी. अतिक्रमण, अनधिकृत बांधकामाची समस्या सोडवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यासोबतच फिल्डवर असणार्‍या अधिकार्‍यांनी सातत्याने निरीक्षण करून तात्काळ पावले उचलावीत.

भंगार दुकाने, पूररेषेतील बांधकामांकडे दुर्लक्ष

कुदळवाडी येथील भंगार दुकाने व गोदामांवर सात दिवस धडक कारवाई करण्यात आली. त्यानंतर शहरातील सर्व भागांतील अनधिकृत भंगार दुकाने व गोदामांवर कारवाई करणार, असे आयुक्त शेखर सिंह यांनी जाहीर केले होते. तसेच, न्यायालयाच्या आदेशानुसार निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे व पत्राशेडवर कारवाईची सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, भंगार दुकाने व पूररेषेतील बांधकामांवर महापालिकेने कारवाई केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT