खडकवासला : पुणे बाह्यवळण रिंगरोडसाठी सिंहगड किल्ला-खडकवासला धरणखोर्यात बेसुमार बेकायदा वृक्षतोड व उत्खननामुळे पर्यावरणाची मोठी हानी सुरू असन, सह्याद्रीच्या डोंगररांगांतील बहुमोल वन, निसर्गसंपदा जमीनदोस्त केली जात आहे.
अवजड वाहतूक, उत्खननासाठी सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याने हजारो पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांवर दुर्घटनांची टांगती तलवार आहे. तसेच ज्या भूमिपुत्रांच्या शिवकालीन मालकी वहिवाटीच्या जमिनीवर रोड केला जात आहे त्या रिंगरोडबाधित शेतकर्यांना शासनाने वार्यावर सोडले आहे. याचे पडसाद बुधवारी (दि. 9) मुंबईतील विधिमंडळ अधिवेशनात उमटले.
स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी आक्रमक भूमिका घेत लक्षवेधी प्रश्नाद्वारे बाधित शेतकर्यांच्या व्यथा तसेच रिंगरोडसाठी बेकायदा सुरू असलेल्या बेकायदा जमीन, डोंगर दर्याखोर्यांची बेसुमार कत्तल, वृक्षतोड, पर्यावरणाची हानी, स्थानिक रहिवाशांची सुरक्षा, याबाबत सडेतोडपणे शासनाला विचारणा केली. त्यावर प्रभारी सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळ अधिवेशन संपण्यापूर्वी पालकमंत्री किंवा नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या प्रश्नावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
गेल्या सहा महिन्यांपासून बाहृवळण रिंगरोडचे काम या भागात सुरू आहे. सिंहगड किल्ल्याच्या ऐतिहासिक स्थळांपासून थेट खडकवासला धरणक्षेत्रापर्यंत बेकायदा मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन, वृक्षतोड करून पर्यावरण जमीनदोस्त करण्यात येत आहे. दुसरीकडे बाधित शेतकर्यांना भरपाई, फेरमोजणी, दस्तदुरुस्ती आदीसाठी वारंवार हेलपाटे मारूनही न्याय मिळत नाही.
सिंहगड खडकवासला धरण भागातील बहुली, भगतवाडी, सांगरून, मांडवी बुद्रुक, वरदाडे, मालखेड, खामगाव मावळ, घेरा सिंहगड, कल्याण , राटावडे या गावांत रिंगरोडचे काम सुरू आहे सर्वात गंभीर स्थिती प्रचंड रहदारी असलेल्या पुणे - पानशेत रस्त्यावरील वरदाडे, मालखेड तसेच सिंहगड भागातील वसवेवाडी, खरमरी आदी गावांत आहे. अवजड मशीनरी डंपर बुलडोझर जेसीबी अशा वाहनांची वाहतूक सुरू आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली नाही. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांवर दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे.
आमदार भीमराव तापकीर म्हणाले, बाधित शेतकर्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, तसेच पर्यावरण व सुरक्षा नियमांचे उल्लंघन बेसुमार वृक्षतोड उत्खनन सुरू आहे. कसलीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असून पर्यावरण नियमांचा भंग होत आहे. गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन सुरू असून महसूल विभाग व एमएसआरडीसी विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या भरपाई, फेरमोजणी, व दस्त दुरुस्तीचे प्रश्न प्रलंबित असून शेतकर्यांना सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहेत.
वन्यजीव, जैवविविधतेची मोठी हानी
पुणे-पानशेत रस्त्यासह वरदाडे, मालखेड आदी ठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर चिखल मातीचे साम—ाज्य पसरले आहे. सध्या पडत असलेल्या धो-धो पावसामुळे चिखल माती वाहत आहे. रस्त्यांची गटारे बुजली आहेत. बेसुमार वृक्षतोडीमुळे घनदाट जंगल आणि हिरव्यागार शेतीने बहरलेला सिंहगडचा ऐतिहासिक परिसर उजाड झाला आहे. सर्वांत अधिक हानी वन्यजीव, जैवविविधतेची झाली आहे.