Illegal Gun Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Illegal Arms Seizure: निवडणुकीआधी पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी कारवाई; सात पिस्तुले जप्त, पाच सराईत गुन्हेगार अटकेत

धुळे जिल्ह्यातून आणलेला अवैध शस्त्रसाठा उघड; तीन ठिकाणी छापे, पोलिसांचा धडाका

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने मोठी कारवाई करत अवैध शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश केला आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी राबविण्यात आलेल्या या कारवायांमध्ये सात पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात ही अवैध शस्त्रे धुळे जिल्ह्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सुहास ऊर्फ पिल्या बालाजी गायकवाड (27, रा. घरकुल, चिखली) , अभय विकास सुरवसे (27, रा. पिंपळे गुरव), ओमकार सिद्धेश्वर बंडगर (21, रा. उमरगा, जि. धाराशिव), समीर लक्ष्मण इजगज (27, रा. मारुंजी) आणि धर्मेंद्र हरिप्रसाद सेन (25, रा. सोलू, ता. खेड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व संशयितांवर यापूर्वीही हत्या, हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाण या स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पहिली कारवाई चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत केली. यात सुहास ऊर्फ पिल्या, अभय सुरवसे, ओमकार बंडगर यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीची चार पिस्तुले, एक हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे आणि 40 हजार रुपये किमतीची एक दुचाकी जप्त केली. दुसरी कारवाई वाकडच्या हद्दीत केली. यात समीर इजगजकडून एक लाख रुपये किमतीची दोन पिस्तुले व एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त केली. तिसरी कारवाई आळंदीच्या हद्दीत केली. यात धर्मेंद्र सेनकडून 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि 500 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले.

पोलिसांनी तीन कारवायांमध्ये पाच लाख 92 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यातील जप्त केलेली शस्त्रे कोणत्या उद्देशाने आणि कुणासाठी आणली होती, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी आळंदी, वाकड आणि सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अवैध शस्त्र बाळगणारे रडारवर

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत सध्या नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुका होत आहेत. महापालिका निवडणूकही जाहीर होणार आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. यात अवैध शस्त्र बाळगणारेही रडारवर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT