Hospital Pudhari
पिंपरी चिंचवड

Municipal Hospital Scam: पिंपरी-चिंचवड रुग्णालयांत बिल घोटाळा; कर्मचाऱ्यांकडून लाखोंचा अपहार

आकुर्डी व भोसरी रुग्णालयांत अफरातफर उघड; बिलिंगमध्ये फसवणूक करून रुग्णांचे आर्थिक शोषण

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलामध्ये कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिलावर एक रक्कम आणि कार्बन कॉपीवर वेगळीच रक्कम दाखवत लाखो रुपये लाटले आले आहेत. महापालिकेच्या आकुर्डी व भोसरी येथील रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. शहरामध्ये महापालिकेने वैद्यकीय व्यवस्था चांगली देण्यासाठी नवीन रुग्णालयांची स्थापना केली आहे. महापालिकेच्या आठ मोठ्या रुग्णालयांसह सुमारे 30 दवाखान्यांमधून शहरातील गोरगरीब रुग्णांवर उपचार केले जातात. त्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.

महापालिका कर्मचाऱ्यांकडून गोरगरीब रुग्णांच्या बिलात हात साफ करत आर्थिक गैरव्यवहार केला जात असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय तसेच, नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये लिपिकाने आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा प्रकार समोर आला होता. त्याच्यावर कारवाई केल्यानंतर देखील इतर रुग्णालयांमध्ये आर्थिक गैरव्यवहार सुरूच आहे. आकुर्डी येथील हभप प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयामधील गैरव्यवहार समोर आला आहे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या मूळ बिलावर पूर्ण रक्कम दाखवली जात असताना, त्याच बिलाच्या कार्बन कॉपीवर मात्र कमी रक्कम नोंदवली जात होती.

म्हणजेच प्रत्यक्षात 100 रुपयांचे बिल असताना कार्बन कॉपीवर केवळ 25 रुपये दाखवून उर्वरित रक्कम स्वतःकडे वळवली जात असल्याची बाब समोर आली आहे. अशा प्रकारे दररोज अनेक रुग्णांकडून लहान-लहान रकमेच्या माध्यमातून तब्बल 9 लाखांचा अपहार केला असल्याचे समोर आले आहे. ती बाब रुग्णालय प्रमुखांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याबाबतचा अहवाल वैद्यकीय विभागाला पाठवला. त्यानंतर विभागाने महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये नवीन भोसरी रुग्णालयामध्येदेखील अशाच पद्धतीने पैसे लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. तेथेही लाखो रुपयांच्या अपहार झाला असून, त्याबाबत चौकशी सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांच्या बिलातही कर्मचार्यांकडून अफरातफर केली जात आहे. त्यामुळे रुग्णांचे आर्थिक शोषण होत असून, महापालिकेची बदनामी होत आहे.

ऑनलाईन व्यवहार नसल्याने गैरसुविधा

या प्रकारामुळे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. बिलिंग प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. महापालिकेत 1 एप्रिल 2025 पासून पेपरलेस डिजिटल कारभार सुरू आहे. मात्र, रुग्णालयात अद्याप ऑनलाईन बिल तसेच, शुल्क स्वीकारले जात नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. रोख रकमेची मागणी केली जात असल्याने कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईकांमध्ये वारंवार खटके उडत आहेत.

दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

आकुर्डी रुग्णालयामध्ये बिलांमध्ये अफरातफर केल्याचे समोर आले आहे. याबाबत वैद्यकीय विभागाकडे माहिती आली असता सर्वच रुग्णालयांची तपासणी केली. त्यामध्ये नवीन भोसरी रुग्णालयामध्येदेखील हा प्रकार घडला आहे. याबाबत चौकशी सुरू केली आहे. त्याचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला देण्यात येईल. त्यानंतर महापालिका आस्थापना व कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सर्व रुग्णालयात लवकरच ऑनलाईन व्यवहार सुरू करण्यात येणार आहेत, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT