Death  Pudhari
पिंपरी चिंचवड

Fugewadi Hooch Tragedy: फुगेवाडी दारूकांडात मृतांचा आकडा 15 वर; 7 जणांवर उपचार सुरू, परिस्थिती गंभीर

विषारी दारूमुळे आणखी दोघांचा मृत्यू; प्रशासनासमोर रुग्ण शोधण्याचे आव्हान कायम

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: फुगेवाडी विषारी दारूकांडातील मृतांचा आकडा शनिवारी (दि. 30) आणखी वाढला आहे. विषारी दारू पिल्यामुळे सात जणांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या रुग्ण शोधण्याचे प्रशासनासमारे आव्हान उभे राहिले आहे.

शनिवारी उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील मृतांची संख्या आता पंधरावर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये अद्याप 7 जणांवर उपचार सुरू असून, त्यापैकी काही जणांची चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजेंद्र टप्पो (36, रा. फुगेवाडी) आणि महेंद्र ओव्हाळ (वय 58, रा. दापोडी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत वृत्त असे, की फुगेवाडी, दापोडी आणि परिसरातील अनेकांनी विषारी दारूचे सेवन केल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला चक्कर येणे, उलट्या होणे, दृष्टी धूसर होणे, अस्वस्थता आणि शारीरिक अशक्तपणा अशी लक्षणे दिसून आली. त्यानंतर अनेकांना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.

या प्रकरणात शुक्रवारी (दि. 29) रात्री उशिरापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी राजेंद्र टम्पो आणि महेंद्र ओव्हाळ यांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. विषारी दारूमुळे बाधित झालेल्या इतर काही रुग्णांवर अद्याप अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रशासन आणि तपास यंत्रणांची चिंता कायम आहे. ओव्हाळ यांचा पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. ओव्हाळ यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य पुरवठादार, विक्रेते आणि वितरण साखळीतील अनेक आरोपींना अटक केली आहे. हातभट्टीच्या दारूमध्ये मिथेनॉल मिसळून त्याची विक्री करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान मिथेनॉलची खरेदी, साठवणूक, मिश्रण आणि वितरण याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विषारी दारूमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या नऊ जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी आठ जणांची प्रकृती स्थिर असून, एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे.
सचिन हिरे, सहायक आयुक्त, पिंपरी- चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT