पिंपरी: शहरामध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी चौकाचौकांत, सार्वजनिक ठिकाणी, बसस्थानक, उद्यान परिसरात बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी प्रकाश व्यवस्थेसाठी लावलेले हायमास्ट तसेच पदपथावरील दिवे अनेक ठिकाणी बंद असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच, त्याच विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लटकलेले चित्र आहे. काही ठिकाणी दिवे सतत बंद-चालू होत असल्याने नागरिकांना डोळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांसाठी बाके आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळेत ज्येष्ठ नागरिकांसह अनेक नागरिक या ठिकाणी काही वेळ बसण्यासाठी येतात. मात्र, अनेक ठिकाणी दिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारात बसावे लागत आहे. काही ठिकाणी हायमास्ट दिव्यांपैकी काही दिवे सुरू तर काही बंद असल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी दिवे पूर्णपणे बंद नसून, खराब झाल्याने ‘ब्लिंक मोड’वर असल्याचे निदर्शनास येते. दिवा काही सेकंद सुरू होऊन पुन्हा बंद होणे, पुन्हा सुरू होणे, असा प्रकार सातत्याने सुरू राहत असल्याने त्या ठिकाणी बसलेल्या नागरिकांना डोळ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. रात्रीच्यावेळी अशा पद्धतीने प्रकाशमान होणाऱ्या परिसरात नागरिकांची गैरसोय तर होतेच, शिवाय सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो.
देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष
सार्वजनिक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून प्रकाशव्यवस्था उभारली जाते. मात्र, दिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे नियमित लक्ष दिले जात नसेल, तर ही व्यवस्था नागरिकांच्या उपयोगाची कशी ठरणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवे बसवणे एवढेच प्रशासनाचे काम आहे का, की ते नियमित सुरू आहेत की नाही याची पाहणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे?
शहरातील चौक, नागरिकांसाठीची बैठक व्यवस्था, उद्यान परिसर आणि स्मशानभूमी परिसर अशा सार्वजनिक ठिकाणी रात्री पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे. त्यामुळे बंद असलेले हायमास्ट दिवे तातडीने सुरू करावेत; तसेच वारंवार बंद-चालू होणाऱ्या दिव्यांची तांत्रिक तपासणी करून त्यांची दुरुस्ती करावी.दिलीप कुंभार, नागरिक