संतोष शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी सकाळी आणि संध्याकाळी अवजड वाहतुकीवर बंदी घातली आहे. यासह दंडात्मक कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिका पोलिसांकडून घेतली जात आहे. चालू वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत एकूण 76 हजार 525 अवजड वाहनांवर चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 9 कोटी 94 लाख 78 हजार 987 रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे; मात्र तरीही वाहनचालकांचा आडमुठेपणा कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अवजड वाहने अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहेत. भरधाव वाहन दामटणे, वाहतुकीच्या परिस्थितीची पर्वा न करता सिग्नल मोडणे, अरुंद रस्त्यांवर जागा काढत ओव्हरटेक करणे आणि समोरून येणाऱ्या वाहनांसमोर अचानक घुसणे, अशा निष्काळजीपणामुळे रस्त्यांवर धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे.
पोलिसांकडून सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत अवजड वाहनांवर बंदी असतानाही अनेक चालक नियम मोडून मुख्य मार्गांवर घुसखोरी करत आहेत. शहरातील वाहतूक विभागाने वारंवार कारवाई करूनही काही चालकांची बेफिकीर वृत्ती कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.
अवजड वाहनांच्या निष्काळजीपणामुळे घडणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे. अपघातानंतर चालकावरच नाही, तर वाहनमालकावरही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वाहनांची नियमित तपासणी, विमा, फिटनेस, वेग नियंत्रक साधने आणि परवानगीपत्र याबाबत मालकाची जबाबदारी स्पष्ट करण्यात आली आहे. वाहनांची देखभाल न करणे, परवाना नसताना चालक ठेवणे किंवा धोकादायक पद्धतीने वाहतूक करण्यास मालकाने मोकळीक दिल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई होत आहे.
शहराच्या सीमावर्ती महामार्गांवर, औद्योगिक पट्ट्यांमध्ये आणि आयटी पार्क परिसरात अवजड वाहनांच्या बेकायदा वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हिंजवडी, चाकण, महाळुंगे, तळवडे, निगडी, देहू रोड मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावर मिक्सर आणि डंपरची मोठी वर्दळ असल्याने पादचारी व दुचाकीस्वारांसाठी परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या पट्ट्यांमध्ये वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढवणे, अतिरिक्त पथके नियुक्त करणे आणि जडवाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र युनिट तयार करणे अत्यावश्यक ठरत आहे.
हिंजवडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे भीषण सत्र सुरू असून बहुतेक दुर्घटनांना अवजड वाहनेच कारणीभूत ठरत आहेत. नुकतेच मिक्सरच्या धडकेत 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी रिदा इमरान खान हिचा मृत्यू, तर तिचा मित्र विवेक ठाकूर गंभीर जखमी झाला. कासारसाई धरणातून परतत असताना मारुंजीतील शिंदेवस्ती येथे भरधाव मिक्सरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यापूर्वी डंपरच्या चिरडल्याने 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला.
अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेमार्फत सक्रिय पद्धतीने मोहिमा राबवण्यात येत आहेत. दंडात्मक कारवाई, नाकाबंदी आणि नियमभंग करणाऱ्या चालकांवर तत्काळ दंड प्रक्रिया, या उपाययोजना सातत्याने चालू आहेत. तरीदेखील काही चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळते. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.विवेक पाटील, उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड