Pimpri Chinchwad Waterlogging
पिंपरी : मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील जनजीवन सोमवारी पूर्णपणे विस्कळीत झाले. शहरातील तब्बल ५९ ठिकाणी पाणी तुंबल्याने ३५ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करावे लागले, तर ११ पूल पाण्याखाली गेल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला. कार्यालयीन वेळेतच अचानक रस्ते बंद झाल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. पर्यायी मार्गांवरही प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागले.
वल्लभनगर, एचए चौक, साई चौक, पुनावळे, ताथवडे आणि मामुर्डी येथील अंडरपास पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना ऐनवेळी मार्ग बदलावा लागला. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात बंद पडली. काही वाहनचालकांनी पाण्याचा अंदाज न आल्याने अंडरपासमध्ये प्रवेश केला; मात्र वाहने बंद पडल्याने ती ढकलत बाहेर काढावी लागली.
रिव्हर व्ह्यू चौक, अहिंसा चौक, भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, चिखली, मोशी, भोसरी, रहाटणी, पिंपळे सौदागर, आळंदी, चाकण आणि देहूरोड परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावला. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पोलिसांनी अनेक मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविली. मात्र पर्यायी मार्गांची क्षमताही अपुरी पडल्याने तेथेही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
शाळांकडून सुटीबाबतचे संदेश उशिरा मिळाल्याने पालकांना मुलांना घरी आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. कामावर जाणारे कर्मचारी, औद्योगिक वसाहतीतील कामगार, मालवाहतूक करणारे ट्रकचालक तसेच रुग्णालयांकडे जाणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अडचणी आल्या.
दिघी-आळंदी परिसरात इंद्रायणी नदीवरील चार पूल पाण्याखाली गेल्याने आळंदी, मरकळ, तुळापूर, धानोरी आणि चाकणकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली. तर निगडी विभागातील धनेश्वर, बटरफ्लाय आणि केशवनगर पूल बंद झाल्याने चिंचवड, भक्ती-शक्ती आणि किवळे परिसरातील नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागला.
चिखली आणि मोशी परिसरातील अनेक मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनांचा वेग अत्यंत मंदावला. पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी फाटा येथे दोन्ही लेन बंद करून वाहतूक भाम फाटा मार्गे वळविण्यात आली. त्यामुळे महामार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
वाकड, हिंजवडी आणि ताथवडे परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. कार्यालयात जाण्यास किंवा घरी परतण्यास नेहमीपेक्षा तिप्पट वेळ लागत असल्याने अनेकांनी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून पाणी ओसरण्याची प्रतीक्षा केली.
सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांनी लहान तळ्यांचे स्वरूप धारण केले आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने वाहतूक पोलिसांनी धोकादायक पूल, अंडरपास आणि नदीकाठच्या मार्गांवर बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच पूल, नदीपात्र आणि अंडरपास परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.