राहुल हातोले
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकाराचे खेळाडू गेली अनेक वर्षे सुसज्ज जिम्नॅस्टीक हॉलच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून महापालिकेकडे सातत्याने मागण्या करूनही अद्याप एकही जिम्नॅस्टीक हॉल उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनकडून या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला जात असला, तरी महापालिकेची उदासीन भूमिका कायम आहे.
शहरातील विविध क्रीडा प्रकारांना महापालिकेने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, स्केटिंगसाठी मैदाने असून बॅडमिंटनसाठी 16 हॉल आणि लॉन टेनिससाठी 12 कोर्ट उपलब्ध आहेत; मात्र जिम्नॅस्टीक या क्रीडा प्रकारासाठी एकही हॉल उपलब्ध नसल्याने खेळाडुंची गैरसोय होत आहे. शून्य सुविधा असलेला हा एकमेव क्रीडा प्रकार ठरत आहे.
स्वतंत्र जागा, निधी नाही
दरवर्षी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये 100 हून अधिक, तर राष्ट्रीय स्तरावर 25 ते 30 खेळाडू सहभागी होत आहेत. असे असूनही जिम्नॅस्टीक हा खेळ महापालिकेच्या प्राधान्य यादीत नसल्याचे चित्र स्पष्ट होते. महापालिकेने चिंचवड, आकुर्डी, थेरगाव, निगडी परिसरात विविध क्रीडा प्रकल्प उभारले असले, तरी जिम्नॅस्टीक स्वतंत्र जागा वा निधी निश्चित करण्यात आलेला नाही. असोसिएशनच्या प्रस्तावांना ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने हा दुर्लक्षाचा मुद्दा की नियोजनशून्यतेचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता तरी महापालिका खेळाडूंच्या मागण्यांना न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खर्चिक क्रीडा प्रकार
जिम्नॅस्टीक हा अत्यंत कौशल्यपूर्ण आणि खर्चिक खेळ आहे. अद्ययावत मॅट्स, बॅलन्स बीम, बार्स यांसारखी साधने महागडी असल्याने अनेक प्रशिक्षकांना स्वतःच्या खर्चाने खासगी अकॅडमी सुरू कराव्या लागल्या आहेत. परिणामी अनेक पालकांना आर्थिक ओझे सहन करावे लागत असून, अनेक होतकरू खेळाडूंचा सराव मर्यादित राहतो.विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पिंपरी-चिंचवड जिम्नॅस्टीक हॉलसाठी जागेची पाहणी सुरू आहे. महापालिका निवडणुका असल्याने यामध्ये बराच वेळ गेलेला आहे. काही दिवसांमध्ये जागेची निवड करण्यात येईल. शहरातील खेळाडू आणि असोसिएशनच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे.पंकज पाटील, उप आयुक्त, क्रीडा विभाग, महापालिका
जिम्नॅस्टीक खेळासाठी कुटुंबियांचा विरोध असूनही मी हा खेळ जोपासला; परंतु शहरात स्वतंत्र हॉल उपलब्ध नाही. त्यासाठीची कोचिंगचीदेखील सुविधा नाही. हा खेळ जोपासताना आहार, व्यायाम, दुखापत झाल्यास मेडिकल सुविधा आदींसाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता असते. महापालिकेची यामध्ये कुठलीच मदत होत नाही.प्रमोद पवळे, खेळाडू, भोसरी
गेल्या आठ वर्षांपासून शहरात जिम्नॅस्टीक हॉलसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पाठपुरावा केला जात आहे. दरवेळी महापालिका आश्वासने देत असून, मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे अनेक खेळाडूंमध्ये निराशा आली आहेसंजय शेलार, सचिव, पिं. चिं. व जिल्हा जिमन्यास्टिक असोसिएशन