पिंपरी: पुण्याबरोबर वाढते औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी देशातील महत्त्वाचे केंद्र बनत आहे. या माध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकेल. विशेषतः प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या माध्यामतून 4 लाख नोकऱ्या निर्माण होऊ शकेल. तसेच, आयटी व अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुणांना फायदा होणार आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पाचे शहरातील उद्योगक्षेत्रातून स्वागत करण्यात आले.
औद्योगिक केंद्र म्हणून शहरासाठी या नव्या उद्योग धोरणाचा मोठा फायदा होणार आहे. त्यात 18 अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणे, केंद्राच्या माध्यमातून 50 लाख रोजगारनिर्मिती होईल. तसेच, अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग उपक्रम आयुक्तालय आणि सेवा आयुक्तालय निर्माण करण्यात येणार आहे. हे आयुक्तालय जर पिंपरी चिंचवड शहरात झाले तर या माध्यमातून सर्वांधिक फायदा हा पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रवाशांना दिलासा
पुणे-लोणावळादरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन उभारण्यासाठी सुमारे 5,100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव येथील नोकरदार, विद्यार्थी तसेच औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. लोकल गाड्यांची संख्या वाढण्यासही मदत होणार आहे. दरम्यान, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी रेल्वे प्रवासी संघ, पिंपरी चिंचवड प्रवासी संघटना या माध्यामतून राज्यातील मंत्रीपासून ते केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून पाठपुरावा केला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत होईल.
रस्ते प्रकल्पाचे महत्त्वाचा टप्पा
रस्ते प्रकल्पात औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गांसाठी निधी जाहीर केला आहे. त्याचा थेट फायदा औद्योगिक गुंतवणूक आणि पर्यायाने व्यवसायवृद्धीसाठी केला आहे. नाशिक फाटा-खेड मार्गासाठी 7 हजार 808 कोटी, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गासाठी 4 हजार कोटी तर, पुणे-शिरूर मार्गासाठी 7,515 कोटीची तरतूद आहे. परिणामी, या प्रकल्पांमुळे उद्योगनगरीतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
तंत्रज्ञानाभिमुख तरुणांसाठी संधी
पुण्यातील स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी 50 हजार स्टार्टअप्सना सहाय्य तसेच गेमिंग उद्योगासाठी 295 हून अधिक स्टुडिओ उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा लाभ हा पिंपरी-चिंचवडमधील तंत्रज्ञानाभिमुख तरुणांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. सध्याच्या आयटी आणि एआय युगात तरुणांनसाठी मोठा पर्याय उपलब्ध आहे.