पिंपरी: शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी धावणाऱ्या घंटागाड्यांनीच रस्त्यावर कचरा पसरविण्यास सुरुवात केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शहरातील विविध भागांत घंटागाड्यांमधून कचरा रस्त्यावर सांडत असतानाही त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. एवढेच नव्हे, तर नागरिकांनी आवाज देऊन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला तरी काही चालक थांबण्याची तसदी न घेता पुढे निघून जात असल्याबाबत नागरिकांकडून तक्रार करण्यात येत आहे.
कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या घंटागाड्याच रस्त्यावर कचरा पसरवत असतील, तर पालिकेची स्वच्छता यंत्रणा नेमकी कशाची स्वच्छता करत आहे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून विविध मोहिमा, जनजागृती आणि स्वच्छतेचे संदेश दिले जातात. तर, दुसऱ्या बाजूला स्वच्छतेचीच जबाबदारी असलेल्या वाहनांमधून रस्त्यावर कचरा सांडत आहे. स्वच्छ शहराचा नारा देणाऱ्या यंत्रणेच्या डोळ्यांसमोरच रस्त्यावर कचऱ्याचा ढिगारे साठत आहेत.
तक्रारी वारंवार; कारवाई कागदावर
घंटागाड्यांमधून कचरा रस्त्यावर पडण्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येत असूनही संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वाहनांमध्ये कचरा वाहून नेताना तो बाहेर पडणार नाही, याची व्यवस्था आहे का?, वाहनांची नियमित तपासणी होते का?, रस्त्यावर कचरा सांडल्यास तो तातडीने उचलण्याची जबाबदारी कोणाची:, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आवाज देऊनही साफ दुर्लक्ष
घंटागाडीतून कचरा रस्त्यावर सांडत असल्याने गाडी चालकास आवाज देऊन ती थांबवण्याचा प्रयत्न याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कचरा संकलन केंद्राचा रस्ताच कचरामय
कचरा संकलन केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर घंटागाड्यांची मोठी वर्दळ असते. मात्र, याच रस्त्यावर घंटागाड्यांमधून पडलेला कचरा ठिकठिकाणी साचलेला दिसतो. कचरा केंद्रात नेण्याच्या घाईत रस्त्यावर पडलेला कचरा मात्र तिथेच ‘संकलित’ होत असल्याचे उपरोधिक चित्र पाहायला मिळत आहे
रस्त्यावर पडलेला कचरा; दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका
घंटागाडीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी रस्त्यावर सांडलेला ओला कचरा आणि चिकट पदार्थ धोकादायक ठरत आहेत. अचानक गाडी घसरल्यास दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कचरा सांडणे हा केवळ अस्वच्छतेचा प्रश्न नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न बनला आहे.
महापालिका प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन घंटागाड्यांची तपासणी, चालक-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि रस्त्यावर कचरा सांडल्यास तातडीने तो साफ करण्याची यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे; अन्यथा कचरा उचलण्यासाठी धावणाऱ्या घंटागाड्याच शहराच्या अस्वच्छतेचे आगार बनतील.आप्पा बोदगीरे, ज्येष्ठ नागरिक
घंटागाड्यांमधून कचरा रस्त्यावर सांडत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली जाईल. संबंधित वाहनांची तपासणी करून कचरा वाहतुकीदरम्यान रस्त्यावर सांडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतही आवश्यक ती कारवाई केली जाईल.डॅा. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका