Pimpri Chinchwad Ganesh Visarjan DJ: गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा आवाज वाढला तर थेट साहित्य जप्त!

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा डीजेचालक-मालकांना इशारा; दहीहंडीत ३६ ठिकाणी कारवाईनंतर विसर्जन मिरवणुकांवर ‘नॉईज मीटर’ची नजर
Ganeshotsav Sound System Ban
Ganeshotsav Sound System BanPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: दहीहंडी उत्सवात ध्वनिमर्यादेचा भंग करणाऱ्या डीजेचालक-मालकांविरोधात तब्बल ३६ ठिकाणी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीकडे मोर्चा वळविला आहे. दहीहंडीतील धडक कारवाईमुळे डीजेचालक-मालकांमध्ये खळबळ उडाली असतानाच विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडू नये, यासाठी पोलिसांकडून सूचना करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

Ganeshotsav Sound System Ban
Pimpri Chinchwad Ganesh Visarjan Traffic: पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश विसर्जनासाठी वाहतूक बदल; ‘या’ मार्गांवर जाणे टाळा!

गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बी सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. मर्यादेपेक्षा अधिक आवाज झाल्यास नागरिकांना त्रास होण्याबरोबरच ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळे यंदा पोलिसांनी उत्सवापूर्वीच डीजेचालक-मालकांना नियमांची जाणीव करून देत कारवाईचा इशारा दिला आहे. विविध ठिकाणी मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याचे आढळल्यानंतर ३६ ठिकाणी चालक-मालकांवर कारवाई केली. स्पीकर, ॲम्प्लिफायर, मिक्सरसह साहित्य ताब्यात घेण्याची कारवाई झाल्याने डीजे व्यावसायिकांमध्ये त्याचा धसका घेतला आहे.

Ganeshotsav Sound System Ban
PCMC 60 Crore Financial Scam: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ६० कोटींचा ‘बोगस उपसूचना’ घोटाळा क्लोज करण्याचा घाट?

डीजे, डॉल्बी, लेझर बीमचा वापर टाळण्याच्या सूचना

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या उपस्थितीत यापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, शांतता समितीचे सदस्य तसेच डीजे चालक-मालकांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये डीजे, डॉल्बी सिस्टीम तसेच लेझर बीमचा नियमबाह्य वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यांच्या स्तरावरही संबंधितांना पुन्हा नोटिसा देऊन नियमांची आठवण करून दिली जात आहे.

मिरवणूक मार्गांवर विशेष नजर

गणेश विसर्जनासाठी शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग आणि घाटांवर मोठा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिस आणि विशेष पथकेही मिरवणुकांवर लक्ष ठेवणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी डीजेचा आवाज, लेझरचा वापर आणि वाहतुकीला होणारा अडथळा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सवातील कारवाईनंतर आता गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस कोणती भूमिका घेतात, याकडे मंडळांसह डीजे व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, 'उत्सव साजरा करा; पण आवाज नियमांच्या मर्यादेतच ठेवा,' असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.

Ganeshotsav Sound System Ban
PMPML Bus Flyover Stop: धक्कादायक! पीएमपीएमएलच्या बस आता थेट फ्लायओव्हरवरच थांबतात; अपघाताचा धोका वाढला

कुठे किती डेसिबलची मर्यादा?

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांनुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ आणि रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल इतकी ध्वनिमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या मर्यादेपेक्षा अधिक आवाज केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

...तर साहित्य जप्त

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे अथवा डॉल्बी सिस्टीमचा आवाज निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळल्यास पोलिसांकडून नॉईज मीटरद्वारे त्याची नोंद घेतली जाणार आहे. उल्लंघन करणाऱ्यां विरोधात ध्वनिप्रदूषण नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यासह स्पीकर, ॲम्प्लिफायर, मिक्सर आणि संबंधित साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Ganeshotsav Sound System Ban
Pimpri Chinchwad Gauri Festival: गौराईच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठा सजल्या; शाडू मातीच्या मुखवट्यांना महिलांची पसंती!

प्रत्येक ठाण्याकडे 'नॉईज मीटर'

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांना नॉईज लेव्हल मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे अथवा अन्य ध्वनिवर्धक यंत्रणेच्या आवाजाची प्रत्यक्ष मोजणी केली जाणार आहे. निर्धारित मर्यादा ओलांडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मंडळासह डीजेचालक-मालकांवर कारवाई केली जाणार आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन अजिबात सहन केले जाणार नाही. नियम मोडणाऱ्या मंडळांसह डीजेचालक-मालकांवर तात्काळ कारवाई करून ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त केली जाईल. यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. उत्सवाच्या नावाखाली नागरिकांना त्रास होईल, असे बेकायदा कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल.

विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news