

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. आगामी विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर भाविकांची होणारी अफाट गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने शहरात व्यापक वाहतूक बदल लागू केले आहेत. पोलिस उपायुक्त (वाहतूक शाखा) विक्रांत देशमुख यांनी मोटार वाहन कायद्यान्वये हे तात्पुरते निर्बंध जारी केले आहेत. विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रमुख विभागांतील अंतर्गत रस्ते बंद ठेवून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
प्रमुख वाहतूक विभागांतील बदल व निर्बंध:
भोसरी व चिखली विभाग:
दिनांक १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान ठरावीक वेळेत भोसरी ब्रीजखाली पीएमपीएमएल बसेसना प्रवेश बंद राहील; या बसेस पांजरपोळ किंवा मॅग्झीन चौकातून धावतील. खडकीकडून हॅरिस ब्रीजमार्गे फुगेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना ग्रेड सेपरेटरमधून मार्ग दिला जाईल. चिखली भागात आळंदी रस्त्यावरील वाहतूक भारतमाता चौकाकडे वळवण्यात आली आहे.
तळेगाव विभाग:
तळेगाव ते एच.पी. चौक दरम्यान २० सप्टेंबर रोजी अवजड वाहनांना बंदी असून ती वडगाव फाटा, नवलाख उंब्रे आणि चाकण मार्गे वळवण्यात आली आहेत. तसेच मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक आणि डोळसनाथ मंदिर परिसरातील मार्ग बंद राहतील.
सांगवी व वाकड विभाग :
२० सप्टेंबर रोजी सांगवीतील माहेश्वरी चौक, जुनी सांगवी रस्ता, क्रांती चौक आणि फेमस चौक दरम्यान खासगी वाहनांना बंदी असून औंधकडे जाण्यासाठी काटेपुरम व मयूरनगरी मार्गाचा वापर करावा लागेल. वाकडमध्ये २३ ते २५ सप्टेंबर रोजी दत्त मंदिर रस्त्यावरील वाहतूक कावेरीनगर व कस्पटे कॉर्नरकडे वळवण्यात येईल.
निगडी व चिंचवड विभाग :
२५ सप्टेंबर रोजी अहिंसा चौक ते चाफेकर चौक, दळवीनगर ब्रीज आणि भोई आळीकडून चाफेकर चौकाकडे येणारे मार्ग पूर्णपणे बंद राहतील. वाहनचालकांनी लिंकरोड, बिजलीनगर आणि खंडोबा माळ मार्गे प्रवास करावा.
हिंजवडी आयटी पार्क व पिंपरी विभाग :
२० ते २५ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत हिंजवडी फेज-३, टाटा टी जंक्शन, मेझा ९ आणि शिवाजी चौक परिसरातील वाहतूक लक्ष्मी चौक व कस्तुरी चौकमार्गे वळवली आहे. पिंपरीमध्ये मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी काळेवाडी पूल, डीलक्स चौक, कराची चौक आणि शगुन चौक मार्ग बंद राहतील; ही वाहतूक भाटनगर व स्मशानभूमी चौकामार्गे सुरू राहील.