Passport  Pudhari
पिंपरी चिंचवड

Foreign Visa Process Resumes: पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासा; मध्यपूर्व देशांतील व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू

युद्धस्थितीमुळे रखडलेली परदेशगमन प्रक्रिया पुन्हा गतीने सुरू; रोजगार व शिक्षणासाठी नागरिकांच्या आशा पल्लवित

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: अमेरिका-इराण अन् इस्त्रायल या देशांतील युद्ध परिस्थितीमुळे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून अनेकांच्या रखडलेल्या परदेशगमनाच्या प्रक्रियेला युद्ध समाप्तीनंतर अखेर गती मिळू लागली आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहरातील शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी परदेशात जाण्याची तयारी करणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ओमान, दुबईसह मध्यपूर्वेतील विविध देशांकडून प्रलंबित व्हिसा अर्जांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून, अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी संपर्क साधला जात आहे.

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर असल्याने येथील अनेक युवक परदेशात रोजगाराच्या संधी शोधत असतात. विशेषतः दुबई, ओमान, कतार, सौदी अरेबिया आदी देशांतील हॉटेल उद्योग, रुग्णालये, बांधकाम, तांत्रिक सेवा आणि विविध सेवा क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे शहरातील अनेक युवकांनी संबंधित देशांतील नोकर्‍यांसाठी अर्ज करून पासपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली होती. काहींना नोकरीची ऑफरही मिळाली होती. मात्र, युद्धामुळे व्हिसा प्रक्रिया ठप्प झाल्याने त्यांचे परदेशात जाण्याचे नियोजन रखडले.

सहा-सात महिन्यांची प्रतीक्षा संपली

व्हिसा मंजुरी रखडल्यामुळे अनेक नागरिक आर्थिक आणि मानसिक तणावाखाली होते. काहींनी भारतातील नोकरीचा राजीनामा देऊन परदेशातील रोजगारावर विश्वास ठेवला होता. तर, काहींनी नवीन आयुष्याची स्वप्ने पाहत सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र, युद्धामुळे दूतावास आणि संबंधित देशांच्या प्रशासकीय प्रक्रिया मंदावल्याने सर्व नियोजन कोलमडले. आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याने संबंधित देशांकडून प्रलंबित अर्जांची छाननी सुरू झाली आहे. अनेकांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी बोलावले जात असून, व्हिसा मंजुरीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊनही व्हिसा न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले होते. आता व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यामुळे त्यांना वेळेत शिक्षणासाठी परदेशात जाण्याची आशा निर्माण झाली आहे. युद्धामुळे थांबलेली परदेशगमनाची चाके आता पुन्हा फिरू लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रोजगार, शिक्षण आणि व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याने परदेशात करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणार्‍या नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

ट्रॅव्हल आणि व्हिसा क्षेत्रात पुन्हा हालचाल

शहरातील ट्रॅव्हल एजन्सी, व्हिसा सल्लागार आणि परदेशी रोजगारासाठी काम करणार्‍या भरती संस्थांमध्ये पुन्हा हालचाल वाढली आहे. रखडलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित यंत्रणा वेगाने काम करत असून, पुढील काही आठवड्यांत मोठ्या संख्येने नागरिक परदेशात रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • ओमान, दुबईसह मध्यपूर्वेतील देशांकडून व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू

  • पिंपरी-चिंचवडमधील अनेक नागरिकांच्या प्रलंबित अर्जांना मिळाला वेग

  • हॉटेल, रुग्णालय, बांधकाम व सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी पुन्हा उपलब्ध

  • सहा-सात महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांना कागदपत्रांसाठी बोलावणे सुरू

  • विद्यार्थी, नोकरी शोधणारे आणि व्यावसायिकांमध्ये नव्याने आशेचे वातावरण

गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी पासपोर्ट काढला. त्यानंतर महिनाभरात व्हिसाची प्रक्रिया पूर्ण होईल या उद्देशाने हातचे काम सोडून गावी जाऊन आलो; परंतु हातचे कामही गेले आणि दुसरे काम हाती घेतल्यास परदेशातील कंपनीचे बोलावणे आल्यास काय करू अशा संभ्रमावस्थेत होतो; परंतु आता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. व्हिसाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक मेडिक्लेम करण्याचे मेल आले आहेत. त्यामुळे परदेशवारीचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकेल.
सतीश इंगळे, रहिवासी
पासपोर्ट बनवून पाच महिने झाले. युध्दामुळे व्हिसाची प्रक्रिया खोळंबली होती. दोन दिवसांपुर्वी ईन्शुरन्ससाठी मेडिकल करण्याची तारीख ठरली तशा प्रकारचा मेल आल्याने हायसे वाटले.
संदीप शिंदे, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT